अजीतदादा गटातील डॉ. शिंगणेंची पुतणीने घेतली शरद पवारांची भेट
बुलढाणा, 18 एप्रिल (गुड इव्हिनिंग सिटी/रणजीतसिंग राजपूत) ः महाराष्ट्रात काका विरूद्ध पुतणे, असा संघर्ष आहे. धनंजय मुंढे यांनी काका गोपीनाथ मुंढेंविरोधात रणशिंग फुंकले होते. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी द्रोह करून राज ठाकरे बाहेर पडले होते. नऊ महिन्यापूर्वी अजीत पवार यांनी आपले काका शरद पवार यांची साथ सोडून भाजपशी संधान बांधले. आता बुलढाण्यातही अशाच राजकीय संघर्षाची सुरुवात होणार असल्याचे दिसते. फक्त याठिकाणी काका विरूद्ध पुतणे नव्हे तर काका विरूद्ध पुतणी, असा सामना होवू शकेल. राष्ट्रवादी अजीत पवार गटाचे आमदार तसेच बुलढाणा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांची पुतणी गायत्री शिंगणे यांनी आज राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या जिल्हा महिला कार्याध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळला आहे. काका अजीत पवार गटात आणि पुतणी शरद पवार यांच्यासोबत असल्याने जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. यासंदर्भात कु. गायत्री शिंगणे यांनी आपल्या सोशल मिडीया अकाऊंटवरून शरद पवार यांच्यासोबतचा फोटो शेअर करीत नव्या जबाबदारीची माहिती जाहीर केली आहे. गायत्री शिंगणे यांची राष्ट्रवादी काँगे्रस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या बुलढाणा जिल्हा महिला कार्याध्यक्ष पदी आज निवड करण्यात आली आहे. त्यांना राष्ट्रवादी काँगे्रस (शरदचंद्र पवार) महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे यांनी नियुक्ती पत्र दिले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँगे्रस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादी काँगे्रस (शरदचंद्र पवार) युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांची उपस्थिती होती.
फेब्रुवारी महिन्यापर्यंत आपल्या सोशल मिडीया अकाऊंटवर त्यांनी घड्याळीचे चिन्ह आपल्या नावासमोर वापरले. परंतु जेव्हा 22 फेब्रुवारी रोजी शरद पवार गटाकडून घड्याळ चिन्ह अजीतदादांकडे गेले, तेव्हापासून गायत्रीताईंनी घड्याळ चिन्ह वापरणे बंद केले. गायत्रीताई शिंगणे यांनी सिंदखेडराजा विधानसभेची तयारी सुरु केली असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तींयांकडून मिळत आहे. त्यांचे काका डॉ. राजेंद्र शिंगणे त्याठिकाणचे आमदार असतांना गायत्रीताई विधानसभेची स्वप्ने कशी काय पाहू शकतात ? हा सवाल अनेकांच्या भुवया उंचावणारा आहे. गायत्रीताई या डॉ. शिंगणे यांचे कनिष्ठ बंधू स्व. गणेश उर्फ मुन्ना शिंगणे यांच्या कन्या आहेत. त्यांचे बंधू गौरव हे सुद्धा राष्ट्रवादी पक्षात सक्रिय आहेत. गायत्रीताईंशी संपर्क करण्याचा प्रयत्न ेला त्यांचा मोबाईल स्विच ऑफ आहे.