प्रतापराव जाधव यांना 3,48,238 मते
नाराजी, फूटाफूट, धुसफूसीच्या चक्रव्यूहाला भेटून प्रतापगड अभेद्यच!
बुलढाणा, ४ जून (गुड इव्हिनिंग सिटी / रणजीतसिंग राजपूत): अवघ्या १०० दिवसांपूर्वीची स्थिती प्रतापरावांसाठी अवघड होती… भाजपकडे जागारी उमेदवारी पुन्हा आपल्याकडे घेणे.. तीनदा निवडून आल्यामुळे मतदारसंघात असलेली नाराजी सावरणे… काही नेत्यांकडून मिळालेले आव्हान थंड करणे.. विरोधकांच्या तूफानी हल्ल्याला शांतपणे परतवणे आणि निवडणूक तंत्राचा सुयोग्य वापर करणे प्रतापरावांशिवाय कुणालाच जमू शकत नाही. २००९ मध्ये लोकसभेची पहिली निवडणूक बलाढ्य उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांना हरवून जिंकणारे खा. प्रतापराव यांच्या २०१४ आणि २०१९ या दोन्ही निवडणूकांमध्ये नरेंद्र मोदींच्या लाटेची मदत त्यांना झाली. आता २०२४ मध्ये मोदी लाट एव्हढी प्रभावी नव्हती. परंतु प्रतापराव जाधव हे नशीब घेवून आलेले आहेत, असे अनेक राजकीय विश्लेषक म्हणतात. त्याची प्रचिती याहीवेळच्या निवडणूकांमध्ये झाली. त्यांनी चौकार मारलाच. यापूर्वी तीन वेळा मेहकर विधानसभा निवडणूक जिंकून हॅट्रीक करणाऱ्या प्रतापरावांनी लोकसमेत चौकार मारला. शिवसेना उबाठा गटाचे प्रा. नरेंद्र खेडकर यांना २९ हजार मतांनी पराभूत करीत प्रतापराव पुन्हा ‘खासदार’ बनले आहेत. एक्झीट पोलमध्ये पुढे असणारी ‘मशाल’ प्रत्यक्ष मतमोजणीत पेटली खरी. परंतु ती धगधगली नाही. निवडणूकीला जेव्हढा खर्च प्रतापरावांनी केला, त्या तुलनेत खेडेकरांचा खर्च अत्यल्प आहे. खेडेकरांनी हात आखडता घेतल्यामुळेही त्यांना पराजयाचे तोंड पाहावे लागले, असे सुद्धा अनेकांना वाटते. नरेंद्र खेडेकरांनी लढविलेल्या किल्ल्याचे मात्र कौतुक करावे लागेल. प्रतापरावांसारख्या दिग्गजाला त्यांनी घाम फोडला. प्रतापरावांच चौकार रोखण्यासाठी त्यांनी थेट षटकारच मारण्याचा जोरदार प्रयत्न केला. परंतु बाऊंड्रीवर ते कैंच आऊट झाले. वसंतराव मगर पाचव्या-सहाव्या क्रमांकावर येणाऱ्या खेळाडूप्रमाणे बॅटींग करून गेले. राजकीय तज्ञांनी वर्तविलेल्या अंदाजापेक्षाही त्यांनी जास्त मते घेतली. वंचित बहुजन आघाडीला मागील निवडणूकीत १ लाख ७० हजार मते घेतली. वंचितचे मगर यांना या निवडणूकीत एक लाख मते घेतली आहेत. वंचितमुळे प्रतापरावांच्या विजयाचा ‘वसंत’ फुलला, अशी प्रतिक्रिया काही ज्णांकडून आपणांस ऐकायला मिळू शकेल. बुलढाणा लोकसभा निवडणूकीच्या रणांगणात रविकांत तुपकर यांच्या परफॉर्मन्सविषयी बोलायचे झाल्यास त्यांना ‘बाजीगर’ म्हणता येईल. तूपकर जेव्हा निवडणूकीत उभे राहिले, तेव्हा महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांना स्पर्धेतही पकडले नव्हते. तूपकर अपक्ष उमेदवार आहेत, ते केवळ ३० ते ४० हजार मते घेतील, असे म्हणणाऱ्यांचे डोळे आज विस्फारले गेले आहेत. अडीच लाख मते घेवून तूपकरांनी निवडणूकीचे चित्रच बदलले. प्रतापराव आणि नरेंद्र खेडेकर दोघांनाही खुले आव्हान देत तूपकरांनी जे करून दाखविले, ते कौतुकास्पद आहे. अपक्ष लढतांना, जवळ पैसा नसतांना आणि कुणीही गॉडफादर नसतांना वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्वाच्या भरवश्यावर एकट्या तूपकरांनी दिलेली झुंज देशभरातील राजकीय तज्ञांनी वाखाणली आहे. त्यामुळे पराजित होवूनही तूपकर ‘मॅन ऑफ दी मॅच’ ठरलेत. आज, आयटीआय प्रशिक्षण केंद्रात मतमोजणी संपन्न झाली. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी मतमोजणीची कमान सांभाळून होते. चोख पोलिस-सैन्य बंदोबस्त आणि पुरेश्या कर्मचाऱ्यांच्या पथकासह मतमोजणी निर्विघ्नपणे पार पडली. इतर उमेदवारांना मिळालेली मते : अशोक वामन हिवाळे १५४०२, संदीप रामराव शेळके १२९९३, गौतम किसनराव मघाडे ८१२२, असलमशाह हसन शाह ६११०, नंदू जगन्नाथ लवंगे ५६९२, मच्छिंद्र शेषराव मघाडे ५२४२, मो. हसन ईनामदार ४९६१, गजानन जनार्दन धांडे ४८२९, दिनकर तुकाराम संबारे ४५४६, बाळासाहेब रामचंद्र इंगळे ३९११, प्रताप पंढरीनाथ पाटील २५४७, संतोष भिमराव इंगळे २५२२, माधवराव सखाराम बनसोडे २४३९, विकासभाई नांदवे २३१८, उद्धव ओंकार आटोळे १९४५, रेखा कैलास पोफळकर १५३०, प्रा. सुमनताई तिरपुडे १५०५ आणि नोटा ३७५०.