बुलढाणा, 25 जून (गुड इव्हिनिंग सिटी) ः ती सध्या शिकत आहे.. नवव्या वर्गात आहे.. हुशार पण आहे.. परंतु तिच्या आईला वाटते की, तिचं लग्न उरकून टाकावं.. तिच्या वडीलांचा, आजीचा आणि इतर नातेवाईकांचा विरोध झुगारून तिच्या आईनं एका ट्रॅक्टरवर काम करणार्यासोबत मुलीच्या लग्नाचा घाट घातला होता.. तो पोलिसांनी हाणून पाडला. बुलढाणा शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांनी पथक पाठवून विवाह थांबविला. येथील प्रभाग क्र. 2 मध्ये लहूजी नगरमध्ये 15 वर्षीय मुलीचे उध्वस्त होणारे आयुष्य वाचले. किन्होळा ब्रह्मपुरी येथील ट्रॅक्टर चालक युवकासोबत तिचे लग्न निश्चीत करण्यात आले होते. याच नगरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी सामाजिक कर्तव्याला जागत पोलिसांनी सदर माहिती दिली आणि आज दुपारीच वर आणि वधू दोन्ही पक्षाकडील मंडळी लग्न जुळविण्याच्या तयारीत असतांना पोलिस घटनास्थळी पोहोचले. मेहंदी लावून आणि दागिन्यांसह तयार असलेल्या मुलीला तसेच नातेवाईकांना तत्काळ पोलिस स्टेशनला आणले. पोलिसांची गाडी पाहून नियोजित वराने धूम ठोकली. महिला बालकल्याण विभागाला यासंदर्भात पोलिसांनी कळविले असून पुढील कार्यवाही सदर विभाग करणार आहे. पोलिसांसमोर विद्यार्थिनीच्या आईने बसा बनाव केला आहे की, आम्ही केवळ लग्न जुळवित होतो, ती सज्ञान झाल्यानंतर तीन वर्षांनी आम्ही लग्न लावणार होतो. यातील सत्यता-असत्यता सोडून देवू पण ठाणेदारांनी घेतलेल्या भूमिकेमुळे सदर विद्यार्थिनी आता शिक्षण पूर्ण करू शकणार आहे. तिचे आयुष्य उध्वस्त होण्यापासून वाचले, हे मात्र नक्की. या कार्यवाहीत पोलिस कर्मचारी श्री हजारे, श्री बुधवंत यांनी मोलाची भूमिका निभावली.