जिथे झाला खून, त्याठिकाणी न्यायाधीशांनी स्वतः केले होते स्थळनिरीक्षण
बुलढाणा, 25 जून (गुड इव्हिनिंग सिटी) ः वहीणीस मारहाण करून खून करणा-या आरोपी दिरास सश्रम जन्मठेप आणि 500 रूपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. भादोला येथे 2020 मध्ये आरोपी राजु चिंकाजी गवई (42) याने सख्खी वहिनी बेबीबाई संतोष गवईला लाकडी दांड्याने मारहाण करून संपविले होते. काल, सोमवार, 24 जून रोजी सदर प्रकरणाचा निकाल लागला. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्नील खटी यांनी आरोपी राजु गवईला जन्मठेप सुनावली. 500 रुपये दंडही ठोठावला आहे. सदर प्रकरणात न्यायाधीश श्री खटी यांनी सीआरपीसीची कलम 310 नुसार स्वतः स्थळनिरीक्षण केले होते हे विशेष.
फिर्यादी संतोष चिंकाजी गवई, रा. भादोला ता. जि. बुलडाणा येथे रहात असुन त्याची पत्नी सौ. बेबीबाई संतोष गवई (वय 55) यांना दोन मुले व तीन मुली आहेत. फिर्यादीला राजु नावाचा भाऊ आहे. त्याने घरून काही पैसे आणि वस्तू चोरल्यामुळे बेबीबाईंनी आपल्या दिराविरोधात पोलिसांत तक्रार दिली होती. यामुळे चिडलेल्या राजु गवईने 27 डिसेंबर 2020 रोजी भादोला येथे फिर्यादीच्या रहात्या घरी बेबीबाई संतोष गवईसोबत भांडण केले आणि लाकडी दाडयांने डोक्यावर आघात केले. त्यामुळे बेबीबाई संतोष गवई याच्या डोक्यातुन रक्तस्त्राव सुरू होता. त्यावेळी शेजारी राहणारा संदीप गवई तेथे गेला असता व सौ. बेबीबाई संतोष गवई हिस तिला काय झाले ? या बददल विचारले असता तिने सांगीतले की, राजु गवई याने मारले. त्यानंतर तिला उपचारासाठी सरकारी दवाखाना बुलडाणा येथे भरती केले. सदर रिपोर्ट वरून आरोपी राजु गवई याचे विरूध्द कलम 307 भा.दं.वी नुसार पोलीस स्टेशन बुलडाणा ग्रामीण येथे अपराध क्र. 460/2020 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. इकडे उपचारादरम्यान दूसर्या दिवशी 28 डिसेंबर 2020 रोजी सौ. बेबीबाई संतोष गवई हया औरंगाबाद येथे घाटी रुग्णालयात मयत झाल्या. त्यामुळे सदर गुन्ह्यामध्ये कलम 302 व कलम 452 आरोपी विरूध्द समाविष्ट करण्यात आला. सदर गुन्हयाचा तपास सर्वप्रथम पीएसआय श्री रामपुर तसेच पीआय सारंग नवलकर त्यानंतर उप विभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांनी करून आरोपीविरूध्द भरपूर पुरावा मिळून आल्यामुळे दोषारोपपत्र बुलडाणा येथील न्यायालयामध्ये दाखल केले.
त्यानंतर सदरचे प्रकरण हे विशेष सरकारी वकील अॅड. संतोष खत्री बुलडाणा यांचेकडे सरकारपक्षाची बाजू मांडण्याकरीता सोपवण्यात आले सदर प्रकरणामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण 14 साक्षीदार तपासण्यात आले. पैकी साक्षीदार संदीप गवई यांचा पुरावा महत्वाचा ठरला. कारण बेबीबाई हिने ती मरण पावण्या अगोदर तिला राजुने मारल्याबाबत शेजारी संदीपला सांगीतले होते. त्याच प्रमाणे ईतर परिस्थितीजण्य पुरावाच्या आधारे सरकारी वकील अॅड. संतोष खत्री यांनी प्रखर युक्तीवाद सादर केला. यावरून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्नील खटी बुलडाणा यांनी आरोपी विरूध्द गुन्हा सिध्द होत असल्याकारणानेआरोपी राजु चिंकाजी उर्फ चिंकाजी गवई यांना कलम 302 भा.दं.वि. मध्ये आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा व रू. 500 दंड ठोठावला. दंड न भरल्यास 2 वर्षांपर्यंत सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. तसेच कलम 452 भा.दं.वि. मध्ये 3 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व रू. 500 रूपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास 6 महीण्या पर्यत्न सश्रम कारावासची शिक्षा सुनावण्यात आली. सदर प्रकरणामध्ये सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अॅड. संतोष खत्री बुलडाणा यांनी कामकाज पाहले त्यांना कोर्ट पैरवी हेकाँ बोरकर व हेकाँ झगरे तसेच हेकाँ मिसाळ पो.स्टे. बुलडाणा ग्रामीण यांनी सहकार्य केले
सीआरपीसी 310 नुसार झालेल्या स्थळ निरीक्षणाने दिली प्रकरणाला कलाटणी !
सदर प्रकरणामध्ये आरोपीचा बचाव होता की, मयत बेबीबाई हया त्याच्या घराच्या टीणावरून लाकडे काढत असताना पडल्या व त्यामुळे बेबीबाईच्या डोक्याला जखम झाल्याबाबत आरोपीच्या विधीज्ञांनी युक्तीवाद केला. यावेळी स्वप्नील सी. खटी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, बुलडाणा यांनी कलम 310 सी. आर. पी. सी नुसार घटनास्थळाचे अवलोकन करण्याकरीता आदेश पारीत केला. बुलढाणा न्यायालयाच्या ईतिहासात प्रथमच या प्रकरणात सीआरपीसी 310 चा वापर करण्यात आला. कोणताही न्यायाधीश किंवा दंडाधिकारी, कोणत्याही चौकशीच्या, खटल्याच्या किंवा इतर कार्यवाहीच्या कोणत्याही टप्प्यावर, पक्षकारांना योग्य सूचना दिल्यानंतर, गुन्हा घडल्याचा आरोप असलेल्या कोणत्याही ठिकाणाला भेट देऊ शकतो किंवा त्याची तपासणी करू शकतो. अशा चौकशी किंवा खटल्याच्या वेळी दिलेल्या पुराव्याचे योग्य मूल्यांकन करण्याच्या हेतूने पाहण्यासाठी आवश्यक असलेले मत, आणि अशा तपासणीत आढळलेल्या कोणत्याही संबंधित तथ्यांचे स्मरणपत्र अनावश्यक विलंब न लावता नोंदवावे, असे ही कलम सांगते. त्यानुसार त्यानुसार सरकारी वकील तसेच आरोपीचे वकीलांना त्याबाबत नोटीस देवुन प्रत्यक्षरीत्या घटनास्थळाचे अवलोकन केले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश बुलडाणा श्री खटी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाचे अवलोकन केले व त्याबाबतीत मेमोरेंडम सुध्दा तयार करण्यात आले. यावरून सुध्दा मा. न्यायालयाने आरोपींच्या वकीलाचा बचाव योग्य नसल्याबाबत सुध्दा न्यायनिर्णयामध्ये उल्लेख केला.