spot_img

डीएचओं डॉ. गीतेंच्या कॅबीनमध्ये ‘तिने’ मारले हातावर ब्लेड !

बुलढाणा, 10 जुलै (गुड इव्हिनिंग सिटी) ः कोण चुक आणि कोण बरोबर? हे सांगता येणार नाही. परंतु सहा महिन्यांपासून पगार लटकवून ठेवल्यामुळे विभागप्रमुख म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते यांच्याकडे गेलेल्या एका आरोग्य सहाय्यकाच्या पत्नीने त्यांच्याच कॅबीनमध्ये हातावर ब्लेड मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. ‘पोट भरायला पैसा लागतो साहेब, मरायला लागत नाही’, अशी प्रतिक्रिया ही पिडीत पत्नी सौ. वनिता ज्ञानेश्वर खंडारे यांनी गुड इव्हिनिंग सिटीला दिली आहे. आज दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडलेल्या घटनेने जिल्हा परिषदेमध्ये एकच खळबळ उडवून दिली. प्रशासनाकडून पोलिसांना कळविण्यात आल्यानंतर मंगला खंडारे यांना पोलिस घेवून गेले. आठ दिवसांपूर्वीही जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गीते हे पगाराचे विचारण्यासाठी आलेल्या ज्ञानेश्वर खंडारे यांच्यावर धावून गेले असल्याचे खंडारे यांनी सांगितले आहे.
एक मुलगी आणि एक मुलगा असा खंडारे यांचा परिवार आहे. रायपूर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आरोग्य सहाय्यक म्हणून ज्ञानेश्वर खंडारे कार्यरत आहेत. त्यांचा मागील सहा महिन्यांपासून पगार प्रलंबित आहे. त्याला कारण काय ? याबाबत जेव्हा गुड इव्हिनिंग सिटीने डीएचओ डॉ. गीते यांना विचारले तेव्हा त्यांनी संागितले की, 2016 पासून काही प्रकरणांमध्ये त्यांची चौकशी सुरु होती. काही महिन्यांपूर्वी प्रशासनातील अधिकारी रायपूर येथे गेले असता, त्यांना खंडारे अनुपस्थित असल्याचे आढळून आले. याशिवाय इतर काही तक्रारीही खंडारे यांच्या विरोधात होत्या. त्यात ते प्रथमदृष्ट्या दोषी आढळून आल्याने त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव होता. त्यामुळे त्यांचा पगार थांबविण्यात आला. अर्थात त्यासाठी मी कारणीभूत नसून संबंधीत वैद्यकिय अधीक्षक तथा तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडचा तो विषय असल्याचेही डॉ. गीते यांनी गुड इव्हिनिंग सिटीच्या प्रतिनिधीला सांगितले.
याउलट, आरोग्य सहा. खंडारे यांचे म्हणणे आहे. ते म्हणाले की, मी सगळ्या चौकशींमधून दोषमुक्त झालो आहे. चौकशी सुरु असली तरी पगार थांबविणे मानवीय दृष्टीकोनातून योग्य नाही. याबाबतचे निर्णयसुद्धा आहेत. तरीही माझा पगार थांबविण्यात आला. मला कधी एम.ओ. कडे पाठविले जाते, कधी अति. जिल्हा आरोग्य अधिकारी तर कधी सांगितले जाते की, डीएचओंकडे जा… मी डीएचओ डॉ. गीते यांना भेटायला गेलो असता त्यांनी मला भर मिटींगमध्ये मारण्याची भाषा केली. मी नियमितपणे कर्तव्य बजावत असूनही मला लक्ष्य केले जात आहे. माझी आर्थिक आणि मानसिक पिळवणूक करण्यात येत आहे.
हातावर ब्लेड मारून घेण्याच्या आजच्या घटनेबाबत वनिता खंडारे यांनी गुड इव्हिनिंग सिटीला सांगितले की, मागील सहा महिन्यांपासून पतिचा पगार नाही.. घरात दाळ-दाणा नाही.. काय खावं, हा प्रश्‍न आहे… माझे पति विचारायला गेले की उडवाउडवीची उत्तरे मिळतात..म्हणून मी स्वतः गेले.. साहेबांना भेटून प्रश्न मार्गी लागेल असे वाटले.. पण साहेब उलटेच बोलत होते.. मलाच झापत होते.. शेवटी मला जे सुचलं ते मी केलं.. जगायला पैसा लागतो, मरायला नाही.. म्हणून पर्समधून ब्लेड काढलं आणि हातावर मारून घेतलं…’, हे सांगत असतांना विमलताई रडत होत्या.. त्यांच्या अश्रूंना खंड नव्हता…
कुठल्याही कर्मचार्‍याचे जीवन पगाराच्या कुबड्यांवरच चालतं.. एक महिना जरी विलंब झाला तर उदरनिर्वाहाच्या सापसिडीवरून कुटूुंब पुन्हा खाली येतं.. सहा महिने कमी नाहीत.. चौकशी, कारवाई, तक्रारी हा भाग चालतच राहणार.. पण तेव्हाच जेव्हा त्या कर्मचार्‍याच्या कुटूंबाचा श्वास चालत राहील.. निलंबन काळातही पगार निघत असतो, मग खंडारेंचा पगार का थांबला, कळायला मार्ग नाही. खंडारेकडे न पाहता प्रशासनाने त्याच्या कुटूंबाकडे पाहणे गरजेचे आहे. अन्यथा आज हातावर ब्लेड मारलेत, उद्या यापेक्षाही मोठे पाऊल जर खंडारे कुटूंबाने उचलले तर !

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत