बुलढाणा, ११ जुलै (गुड इव्हिनिंग सिटी) मुलभूत सुविधा देण्याची जबाबदारी असलेली ग्रामपंचायत जर निष्क्रीय असली तर आंदोलनाशिवाय नागरिकांना पर्याय उरत नाही. वृंदावन नगरच्या विस्तारीत भागात अनेक वर्षांपासून वसाहत होवूनही रस्ते नाहीत. पावसाळ्यात चिखलमय रस्त्यावरून अनंत अडचणींचा सामना करीत जाण्याची नागरिकांची मजबूरी आहे. निवेदनातून आंदोलनाचा इशारा दिल्यानंतरही कुठलेही पाऊल न उचलल्याने काही महिला आंदोलकांनी माळविहीरच्या ग्रामपंचायत कार्यालयावर धडक देवून चिखल फेकला. हा चिखल आमच्यावर फेकल्याची तक्रार ग्रामसेवकाने दिली आहे. या तक्रारीवरून ७ महिला आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माळविहीरचे ग्रामसेवक श्याम प्रेमदास जाधव यांनी शहर ठाण्यात तक्रार देतांना म्हटले की, २५ जून रोजी वृंदावन नगर येथील विस्तारीत भागातातील खरात रस्त्यांवर मुरूम टाकण्यासंदर्भात ठराव घेण्यात आला होता. दरम्यान १ जुलै २०२४ रोजी सौ. निशा अरविंद पावडे आणि इतर ८ महिलांनी ग्रामपंचायतला वृंदावन नगरच्या विस्तारीत भागातील रस्ते पावसामुळे चिखलमय झाले असून तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे केली होती. या निवेदनात ग्रामपंचायत कार्यालयात ८ जुलै रोजी चिखली आणून टाकण्याचा इशाराही देण्यात आला होता. ८ जुलैच्या सकाळी १० ाजेदरम्यान ते, सरपंच सौ. अर्चना दिलीप आडवे, उपसरंपच विठ्ठल घोडके, शिपाई सदाशिव आडवे आणि कॉम्प्युटर ऑपरेटर गणेश जाधव तसेच सदस्य कमल चौधरी, सौ. आशा शेळके, सौ. रंजना बडगे असे सर्व ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित होतो. त्याचवेळी त्याठिकाणी सौ. निशा पावडे आणि इतर महिला दाखल झाल्या. त्यांनी सोबत चिखल आणला होता. हा चिखली त्यांनी कार्यालयात पसरविला तसेच आमच्या अंगावरही चिखली मारला. एक रूपयाचा कडीपत्ता ग्रामपंचायत झाली बेपत्ता, जय संविधान जय हिंद, छत्रपति शिवाजी महाराज की जय, कार्यालयाचे करायचे काय खाली मुंडके वर पाय, अशा प्रकारच्या घोषणा देत महिला आंदोलकांनी हाय हायची नारेबाजीही केली. सौ. निशा पावडे आणि सौ. दिपाली वायचोळ यांनी कार्यालयाच्या ओट्यावर भाषण केले. कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता बेकायदेशिररित्या एकत्रित जमून चिखलफेक करणाऱ्या महिलांविरोधात कारवाईची मागणी ग्रामसेवकाने आपल्या रिपोर्टमध्ये केली आहे. पोलिसांनी या तक्रारीवरून आंदोलक सौ. निशा पावडे, सौ. दिपाली वायचोळ, सौ. वंदना टकले, श्रीमती माया हिवाळे, श्रीमती गोकर्णा मोकासरे, श्रीमती मंगला लहाने, मीनाबाई राठोड इत्यांदीविरोधात कलम १८९ (२), १३२, ११५, १२५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. तपास हेकाँ सुभाष म्हस्के करीत आहेत.