spot_img

.. तो अंगावर गेला, डसला, कागदे फाडली तरी निर्दोष सुटला ! तहसील कार्यालयावर ‘विनोद’ अंगलट

बुलढाणा, 26 जुलै (गुड इव्हिनिंग सिटी) ः  एखादी व्यक्ती तालुका न्यायदंडाधिकार्‍यांच्या ऑफिसमध्ये येते.. तिथल्या कर्मचार्‍यांशी हुज्जत घालते.. एका कर्मचार्‍याच्या हाताला डसते आणि टेबलवर ठेवलेली कागदपत्रे फाडते.. तरी न्यायालयाने त्या व्यक्तीला निर्दोष सोडले. हे कसं शक्य आहे ? असा प्रश्न आपल्याला पडला असेल. पण अनेक गुन्हे हे न्यायालयात टिकत नाही. एखादेवेळी व्यक्ती खरंच निर्दोष असते. प्रकरण वेगळे असते, त्याला वेगळे स्वरूप दिले जाते. तर कधी कधी तांत्रिक पुराव्याच्या आभावी आणि प्रकरणांमध्ये राहिलेल्या त्रुटींमुळे व्यक्ती निर्दोष सुटते. माहिती अधिकार कार्यकर्ता विनोद बोरकर यांच्याबाबतीत सरकारचा युक्तीवाद न्यायालयात टिकला नाही. उपलब्ध पुरावे,नोंदविलेल्या साक्ष आणि आरोपीच्या वकीलांनी केलेल्या जोरदार युक्तीवादामुळे दोन वर्षांपूर्वी तहसील कार्यालयात ‘राडा’ करणारे विनोद बोरकर ‘बाईज्जत’ बरी करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा ‘विनोद’ तहसील कार्यालयाच्याच अंगलट आला, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
घटना 3 मार्च 2022 रोजी सकाळी 10 वाजेची होती. माहितीचा अधिकार अंतर्गत तानाजी नगर मधील रहिवासी विनोद मधुकर बोरकर यांनी बुलढाणा तहसील कार्यालयात विविध प्रकारची माहिती मागविली होती. परंतु सदर माहिती देण्यास कार्यालयाकडून टाळाटाळ होत असल्याने ते घटनेच्या दिवशी सकाळी 10 वाजता तहसील कार्यालय बुलढाणा येथील पुरवठा विभागात गेले. त्याठिकाणी नायब तहसीलदार अमरसिंग पवार आणि इतर कर्मचारी होते. याचवेळी बोरकर आणि कर्मचारी समाधान जाधव यांच्यात राडा झाला. जाधव यांचा आरोप होता की, बोरकर यांनी त्यांच्या हाताला चावा घेतला, कागदे फाडली आणि अंगावर आलेत. अधिकारी अमरसिंग पवार यांच्या तक्रारीवरून बोरकर यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याची कलम 353 दाखल करण्यात आली. याशिवाय भादंवि 324, 504, 509 तसेच चावा घेतल्याची 427 कलम बोरकर यांच्याविरोधात नोंदविण्यात आली. गुन्याचा तपास पूर्ण करून दोषारोपप्रत्र ज़िल्हा न्यायधीश बुलढाणा येथे सादर करण्यात आले होते. सदर प्रकरणात 6 साक्षी पुरावे तपासण्यात आले. परंतु तपासातील त्रुटी व संशयाचा आधारे प्रमुख सत्र न्यायाधीश बुलढाणा एस. सी. खटी यांनी विनोद बोरकर यांचे सदर आरोपातून काल, गुरुवार 25 जुलै 2024 रोजी निर्दोष मुक्तता केली. बोरकर यांच्यावतीने अ‍ॅड. प्रविण वाघमारे यांनी प्रबळ युक्तीवाद केला. घटनेच्या दिवशी कार्यालयातील सिसिटीव्ही बंद असणे, सकाळी 10 वाजताची घटना आणि दोन तासांनी समाधान जाधव यांना मेडीकलसाठी पाठविणे, दुपारी 2.30 ला पोलिस तक्रार नोंदविणे, हालचाल रजिस्टरमध्ये बोरक यांची नोंद नसणे तसेच अभिलेखाची कागदपत्रे फाडल्याचा कुठल्याही प्रकारचा पंचनामा न करणे, अशा विविध त्रुटी अ‍ॅड. वाघमारे यांनी जिल्हा न्यायाधीशांच्या निदर्शनास आणून दिल्या. याच बाबी प्रकरणात महत्वाच्या ठरल्या. त्यामुळे संशयाच्या पार्श्वभूमिवर विनोद बोरकर निर्दोष सुटलेत.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत