- मराठीत अर्ज भरला असेल तर बाद होणार
- ज्यांनी मराठीत अर्ज भरला त्यांची चिंता वाढली
बुलढाणा, 31 जुलै (गुड इव्हिनिंग सिटी/ अजय काकडे ) ः मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत धक्कादायक आदेश समोर आला आहे. हा आदेश पडताळणीसंबधी आहे. या आदेशात स्पष्ट उल्लेख केला आहे की, ज्यांनी मराठी भाषेत अर्ज केला आहे, त्यांचे अर्ज रद्द करण्यात यावे. पडताळणीचे काम 5 ऑगस्टच्या पूर्वी पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहे. ज्यांनी मराठीमध्ये अर्ज भरला आहे, त्या लाडक्या बहिणींचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा बी.पी. वाढविणारा हा आदेश नुकताच धडकला आहे. या योजनेबाबत आधीच उलटसुलट चर्चांना आणि अफवांना ऊत आले असतांना अशा प्रकारचा निर्णय अनेकांसाठी धक्कादायक आहे. कारण त्या अॅप्स माध्यमातून अर्ज करीत असतांना मराठी भाषेचा सुध्दा पर्याय दिला आहे. परंतू अशा प्रकारचा शासन निर्णय आल्याने अनेकांची धाकधूक वाढली आहे. 31 ऑगस्ट ही शेवटची तारीख असतांना अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला आहे. आधीच या योजनेचा अर्ज केल्यानंतर अनेक समस्यांना नागरिकांना समोर जावे लागत आहे. अर्ज करीत असतांना ओटीपी ची समस्या असेल किंवा फोटो कशाप्रकारे अपलोड करायचे याबाबत कुठलेच मागदर्शन अद्याप पर्यंत अंगणवाडी कर्मचार्यांना करण्यात आले नाही. कशाप्रकारे ही योजना राबविल्या जाईल याबाबत सांशकता आहे. महाराष्ट्र सरकारने 28 जून रोजी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची घोषणा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजीत पवार यांनी अर्थसंकल्प सादर करतांना केली. या योजने अंतर्गत महिलांना 1 हजार 500 रूपये प्रती महिना मिळणार आहे. या योजनेसाठी नोंदणी करण्याची सुरूवात 1 जुलै पासून सुरू झाली आहे. या योजनेसाठी काही कागदपत्रांची पुर्तता करावी लागणार असल्यामुळे अनेकांची कागपत्रे जमा करण्यासाठी धावपळ सुरू आहे. अर्ज करण्यासाठी 15 जुलै हा शेवटचा दिवस असल्याची माहिती सगळीकडे जाताच अजून त्या गर्दीत भर पडली. परंतू प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे की, या योजनेसाठी अर्ज करण्याची तारीख 31 ऑगस्ट 2024 ठेवण्यात आली आहे.