माँ जिजाऊ अर्बनचे उपाध्यक्ष शिवाजीराव तायडे यांचे आदर्श कार्य
बुलढाणा, 1 ऑगस्ट (गुड इव्हिनिंग सिटी/रणजीतसिंग राजपूत) ः आई ही मायेचं लदबलेलं झाड असलं तरी वडील म्हणजे रखरखत्या उन्हातील सावली असतात.. आई आणि वडीलांच्या प्रेमात तुलना करणे शक्य नाही. पण बाप-बेटीचं नातं सुगंधी बागेसारखं सतत दरवळणारं असतं.. म्हणून अनेकांकडून अनेकदा ऐकायलाही मिळतं की, मुलीचा बापात आणि बापाचा मुलीत खूप जीव असतो..मुलीत जीव असणाऱ्या एका पित्याने आगळ्या-वेगळ्या मात्र आदर्श वाढदिवस साजरा केला. बुलढाण्यातील माँ जिजाऊ अर्बन पतसंस्थेचे उपाध्यक्ष शिवाजीराव तायडे यांनी आपल्या 10 वर्षीय मुलीचा वाढदिवस अंध-अपंग-मूकबधीरांना अन्नदान करून साजरा केला. वाढदिवस कसा साजरा करावा, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, परंतु सामाजिक भान जपत उपेक्षितांसोबत आणि समाजाला आदर्श ठरावा, असाही वाढदिवस साजरा करता येऊ शकतो, याचे उदाहरण तायडे यांनी प्रस्तुत केले.
येथील अपंग कल्याण व पुनर्वसन संस्थेच्या अंध-अपंग तसेच मूकबधीर विद्यालयात जवळपास 120 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांसोबत शिवाजीराव तायडे यांनी आपली मुलगी आरूषिचा वाढदिवस साजरा केला. कॅम्ब्रीज स्कूलमध्ये इयत्ता पाचवीत शिकत असलेल्या आरूषिचा 2 ऑगस्ट रोजी वाढदिवस असतो. आज, 1 ऑगस्ट रोजी वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला तायडे आपल्या कुटूंबियांसह अपंग विद्यालयात पोहोचले. अंध, अपंग आणि मूकबधीर अशा तिनही विभागातील विद्यार्थ्यांना आरूषिच्या वाढदिवसानिमित्त स्नेहभोजन देण्यात आले. 120 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी मिष्टान्न ग्रहण केले. यासाठी येणारा खर्च तायडे यांनी संस्थेला सुपूर्द केला. याप्रसंगी तायडे यांची पत्नी सौ. सरलाताई तसेच त्यांचे आई-वडील उपस्थित होते. याशिवाय तायडे यांचा मित्रपरिवार आर्किटेक्ट आईदन प्रजापति, रवि हुडेकर कुटूंबासह हजर होते. या सर्वांनी अंध-अपंग विद्यार्थ्यांना जेवण वाढून वाढदिवसाचा आनंद द्विगुणित केला.
कार्यक्रमाला यशस्वी बनविण्यासाठी अपंग कल्याण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश छाजेड, सचिव जयसिंग जयवार यांच्या मार्गदर्शनात मुख्याध्यापक विजय ढवळे, मुख्याध्यापक प्रियंका माळी, मुख्याध्यापक रमेश आराख तथा टी.एस. पवार, विठ्ठल तायडे, सोमेश माळी, रमेश सराफ, किशोर खोलाडे, प्रविण सोळंके, सै. जहीर, संगीता कोटजावळे, अवसरमोलताई, बेबीताई महाले आदिंनी सहकार्य केले. शिवाजीराव तायडे अनेक सामाजिक चळवळींना बळ देणारे व्यक्तीमत्व म्हणून परिचीत आहेत. आपल्या जन्मगावी अंभोडा येथे गावातील सेवाभावी लोकांसोबत स्मशानभूमि विकासासोबत इतर काही सामाजिक कामे नेटाने पुढे नेत आहेत. मुलीचा वाढदिवस अंध-अपंगांसोबत साजर करून त्यांनी पुन्हा एक साामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे की,
जरूरी नहीं की, रोशनी चिरागों से ही हो
बेटीयाँ भी घर में उजाला करती है ॥

