समस्त काँग्रेसजनांनी बैठकीसाठी उपस्थित रहा ः राहुल बोंद्रे यांचे आवाहन
बुलढाणा, 12 ऑगस्ट (गुड इव्हिनिंग सिटी) ः केंद्रात सत्तेत येण्यापासून काँग्रेसप्रणित इंडीया आघाडी दूर राहिली असली तरी इंडीया आघाडीला मिळालेला जनाधार आश्वासक आणि काँग्रेसजनांमध्ये उत्साह निर्माण करणारा आहे. त्यामुळेच काँग्रेसकडे अनेकांचा ओढा वाढला असून विधानसभेसाठी इच्छूकांची गर्दीही वाढली आहे. याच परिस्थीतीचा अंदाज घेण्यासाठी चाचपणी म्हणून ज्येष्ठ नेते रमेश चेन्नीथला यांना काँग्रेस हायकमांडने जबाबदारी दिली आहे. उद्या, मंगळवार, 13 ऑगस्ट रोजी चेन्नीथला बुलढाणा दौर्यावर आहेत. याच दौर्यात ते पश्चिम विदर्भाचा आढावा घेत आहेत, हे विशेष. जवळपास दोन दशकांपूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या पश्चिम विदर्भात पुन्हा एकदा काँग्रेसचे अधिपत्य राहावे, यासाठी वरिष्ठ पदाधिकार्यांनी परिश्रमाची तयारी ठेवली आहे. त्यामुळे सदर आढावा बैठकीसाठी समस्त काँग्रेसजनांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तसेच माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी एका गुड इव्हिनिंग सिटीच्या माध्यमातून केले आहे. महत्वाची बाब म्हणजे जिल्हा काँग्रेसचे धोरणकर्ता खा. मुकुल वासनिक सुद्धा बैठकीमध्ये उपस्थित राहणार आहेत.
विधानसभा 2024 निवडणूकपूर्व तयारी काँग्रेच्या आढावा बैठकीचे उद्या, मंगळवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी सहकार विद्यामंदिर सभागृह बुलढाणा येथे आयोजन करण्यात आले आहे. विधानसभा निवडणूकपूर्व तयारी आढावा बैठक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या मार्गदर्शनात प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येणार आहे. तसेच यावेळी भा.रा.कॉ.कमिटीचे सरचिटणीस खा.मुकुल वासनिक, विधिमंडळ नेते आ.बाळासाहेब थोरात, विरोधीपक्ष नेते विजयजी वडेट्टीवार, विधानपरिषद गटनेते सतेज पाटील या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. बुलढाणा अकोला व वाशीम जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक पूर्वतयारी आढावा बैठकीला बुलढाणा जिल्हा काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्यांनी मोठ्या संखेने उपस्थित राहावे असे आवाहन बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी केले आहे.
बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे कि मंगळवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी विधानसभा निवडणूक पूर्वतयारी करिता बुलढाणा अकोला व वाशीम जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक पूर्वतयारीचा आढावा या वेळी घेण्यात येणार आहे. बुलढाणा येथील सहकार विद्या मंदिराचे सभागृहात 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत बुलढाणा,अकोला,वाशीम जिल्हा काँग्रेस कमिटी यांची एकत्रित बैठक आयोजित करण्यात आली आहे. दुपारी 1 ते 2 दरम्यान भोजन अवकाश व त्यांनतर दुपारी 2 ते 3 वाशीम जिल्हा काँग्रेस कमिटी आढावा बैठक, दुपारी 3 ते 4 या वेळेत अकोला जिल्हा काँग्रेस कमिटी आढावा बैठक, सायंकाळी 4 ते 5 या वेळेत बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटी आढावा बैठक पार पडणार आहे.
विधानसभा निवडणूक पूर्वतयारी आढावा बैठकीला उपरोक्त बुलढाणा,अकोला,वाशीम या जिल्ह्यातील काँग्रेसचे जेष्ठ नेते, आजी माजी खासदार,आमदार, काँग्रेस कमिटी सदस्य, प्रदेश प्रतिनिधी व पदाधिकारी,जिल्हा पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष, आघाडी संघटनेचे पदाधिकारी, विभाग व सेलचे पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारी संस्थांचे सदस्य आदी मान्यवरांनी या महत्वपूर्ण बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.