बुलढाणा, 18 ऑगस्ट (गुड इव्हिनिंग सिटी/रणजीतसिंग राजपूत) : दिल्ली येथे घडलेल्या निभर्या कांडला 12 वर्षे झाल्यानंतर कोलकाता येथे तसेच दूसरे हत्याकांड घडले. महिला डॉक्टरवर अमानुष लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्याकांडातील आरोपी संजय रॉय हा संबंधित शासकीय रूग्णालयामध्ये अनधिकृतपणे वावरायचा. पेंशटला अॅडमिट करण्यासाठी पैसे घेवून तो रॅकेट चालवायचा. असेच रॅकेट चालविणारे बुलढाण्यातही काही हॉस्पीटलसाठी काम करीत आहेत. पेंशट भरती करून त्याबदल्यात एकुण बिलाच्या दहा टक्के, वीस टक्के तर कधी कधी 30 टक्क्यांपर्यंत रक्कमही हे एजंट घेतात. गुड इव्हिनिंग सिटीकडे याचे भक्कम पुरावे आहेत. परंतु कुण्या हॉस्पीटलची किंवा कुणा डॉक्टरची बदनामी करण्याचा आमचा कुठलाही हेतू नाही. केवळ या एजंटमधून कुणाची नियत बदलून जर तो ‘संजय रॉय’ झाला तर एखादी धक्कादायक घटना घडू शकेल.
कोलकाता येथे घडलेल्या घटनेनंतर समाजमन सुन्न आहे. हॉस्पिटल प्रशासनाचा भाग असणार्या संजय रॉय कडून त्या महिला डॉक्टर वर अत्याचार करण्यात आले व तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेचे देशभर पडसाद उमटत आहे. पंरतू यासाठी काही उपयोजना करणे गरजेचे आहे. कारण नुसत्या घोषणा होऊन फायदा नाही तर ते अंमलात येणे गरजेचे आहे. आरोपी संजय रॉय ची पोलिसांना मदत करण्यासाठी त्याची निवड करण्यात आली होती. त्याचे सर्व डॉक्टरांशी चांगले संबध होते. तो सहज डॉक्टरांच्या कॅबिनमध्ये जाणे असो की इतरत्र हॉस्पिटलमध्ये सहज फिरू शकत होता. पेंशटला अॅडमिट करण्यासाठीचे रॅकेट ही तो चालवत होता. कोलाकाता पोलिसांमध्ये नोकरी लावण्यासाठी त्याने पैसे उकळल्याची ही माहिती समोर आली आहे.
कोलकाता प्रकरणामधील या व्हॉलेंटीयरचे संबध त्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनशी होते. तो हॉस्पिटल प्रशासनात ढवळाढवळ करायचा. काही संबध नसतांना तो हॉस्पिटलमध्ये यायचा. उद्या चालून कोलकाता घटनेची पुनरावृत्ती बुलढाण्यात सुध्दा होऊ शकते. कारण असे अनेक रॉय बुलढाण्याच्या काही हॉस्पिटल मध्ये मुक्तपणे वावरतात. ते डॉक्टरांचे एंजट म्हणून काम करतात त्यांना आवर घालणे खूप गरजेचे आहे. त्यांचा हॉस्पिटलच्या प्रशासनाशी कुठलाही संबध नसतांना डॉक्टरांशी 30 ते 40 टक्कयांपर्यंत कमिशन लाटणे असा बोगस धंदा काही हॉस्पिटल मध्ये सुरू आहे. आपल्याला काय, आपला व्यवसाय चालतोय न… अशा भावनेतून संबंधित एजंटांचे लाड पुरविण्याचे काम काही डॉक्टर करीत आहेत. बुलढाण्यात अनेक प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ डॉक्टर आहेत, ज्यांना कुठल्याही एजंटची किंवा दलालांची गरज भासत नाही. निर्मळ प्रॅक्टीस आणि नैतिक वैद्यकीय सेवेच्या आधारावर त्यांनी आपला नावलौकिक केलेला आहे. यात अनेक सिनीअर डॉक्टरांचा समावेश आहेच. परंतु काही ज्यूनिअर डॉक्टरही याच नैतिक मार्गाने प्रॅक्टीस करीत आहेत. परंतु झटपट श्रीमंत होण्याच्या नादात काही हॉस्पिटल्सनी एजंट ‘पाळून’ ठेवले आहेत. विशेष म्हणजे एजंटांकडून आलेल्या रूग्णाकडून चांगलेच पैसे उकळले जातात. कारण एजंटला सुद्धा पैसे द्यावे लागतात.
काल निघालेल्या निषेध मोर्चातून वैद्यकीय संघटनांनी ही सुद्धा मागणी केली आहे की, सर्व हॉस्पिटलांना सुरक्षा पुरवावी, तसेच येणार्या जाणार्या अनोळखी व्यक्तींची नोंद ठेवावी. महिला परिचारिका, इतर सहाय्यक महिला डॉक्टर यांना एंजट पासून भविष्यात काही धोका निर्माण होणार नाही, याची शाश्वती कोण घेऊ शकेल. केवळ ‘पैसे कमाओ’ अशी नियत असणार्या एजंटांकडून नैतिक वर्तणुकीची अपेक्षा करणे मूर्खपणाचे आहे. अशा काही एजंटांचे संबंधित डॉक्टरसोबत खटकेही उडाल्याचे किस्से आहेत. यातूनच जर कुणी भविष्यात दुश्मनी साधली तर संबंधित हॉस्पीटल आणि डॉक्टरला महागात पडेल. म्हणून एव्हढेच म्हणता येईल की, जे डॉक्टर एजंटांच्या माध्यमातून खिसे गरम करीत आहेत, ते भविष्यातील एखाद्या धोकादायक घटनेला आमंत्रितही करीत आहेत.