बुलढाणा, १९ सप्टेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुलढाणा दौऱ्यावर असतांना काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना निवेदन देण्याचे प्रयत्न केले परंतू पोलिसांनी त्यांना रोखले. कांग्रेसचे राष्ट्रीय नेते तथा माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांना बुलढाणा पोलिसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बुलढाणा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या राहत्या घरून ताब्यात घेतले होते. आज सकाळी हर्षवर्धन सपकाळ यांच्या निवासस्थानी बुलढाणा पोलिसांनी मोठ्या पोलिस फाट्यासह अटक केली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना सांगितले की ‘ये सरकार हम से डरती है। पुलीस को आगे करती है’. त्यांच्यासह दत्ता काकास, अंकुश देशमुख, गजनफर खान, तुषार खरे, शेख मुज्जू सय्यद उबैद, अभय सोनुने, विजय मोरे यांना ताब्यात घेतले होते. काँग्रेस नेत्या अॅड. जयश्रीताई शेळके या निवेदन द्याला जात असतांना त्यांची महिला पोलिस कर्मचाऱ्याशी चांगली झटापट झाली. त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदन देण्यासाठी जाण्याचा अॅड. जयश्रीताई शेळके यांनी खूप प्रयत्न केला. परंतू महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांना तिथंपर्यंत जाऊ दिले नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर आले असता राज्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेत मालाला भाववाढ मिळावी यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. संजय राठोड, माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, जयश्री ताई शेळके यांनी शेतकऱ्यांच्या रक्ताने लिहिलेले निवेदन मुख्यमंत्री यांना जयस्तंभ चौकामध्ये देत असताना पोलिसांनी बळाचा वापर करून अॅड. संजय राठोड, माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्यासह बुलढाणा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक अॅड. गणेश- सिंग राजपूत, संदिप सोनोने यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केले होते.