बुलढाणा, २२ सप्टेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) : शहरातील विद्यालय, महाविद्यालयासमोरील चिडीमारीच्या घटनांना आळा बसवण्यासाठी व वाहतुकीची होणारी कोंडी सोडवण्यासाठी किमान विद्यालय, महाविद्यालये भरण्याआधी व नंतर वाहतूक पोलिस तैनात करण्यात यावे, अशी मागणी पालक वर्गाकडून करण्यात येत आहे. येथील नांदुरा रोडवर अधिक प्रमाणात शैक्षणिक संस्था आहेत. त्यातच दुकान न्यायालय, शासकीय व निमशासकीय कार्यालयेही आहेत. यामुळे या मार्गावर नेहमीच वर्दळ असते. शाळा भरण्याआधी व सुटल्या नंतर त्यात भर पडते. काही विद्यार्थी ऑटो मधून शाळेत येतात. हे ऑटो चालक आपली वाहने शाळे समोरील रस्त्यावर उभी करतात. त्यातच रस्त्याच्या कडेला बांधण्यात आलेल्या ना- लीवर अस्थायी अतिक्रमण आहे. या दुकानावर येणारे ग्राहक आपली वाहने रस्त्यावरच उभी करतात. या वाहनांमुळे पादचाऱ्यांची मार्गक्रमण करताना कसरत करावी लागते. शाळा सुटण्याआधी व नंतर चिडीमारीचे प्रकार शाळे समोर घडतात. शाळांसमोर वाहतूक पोलिस दिसून येत नसल्याने या चिडीमारांना कोणाचाच धाक नसतो. हीच परिस्थिती वाहनधारकांची आहे. शाळेसमोर वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी. खामगाव, बुलडाणा वाढती लोकसंख्या अन् वाहनांमुळे सध्या वाहतुकीची कोंडी होत असली तरी त्याला जबाबदारही पालिका व पोलिस प्रशासन आहे. बुलडाणा हे जिल्ह्याचे ठिकाण, पण कमी लोकसंख्या असलेले शहर असले तरी शहरातील काही महत्वाची रस्ते नेहमीच वाहतूक कोंडीने रहदारी विस्कळीत करत आहेत. खामगाव हे मोठे शहर असून येथेही हीच परिस्थिती आहे. त्यातच विद्यालय, महाविद्यालयाच्या ठिकाणीही टवाळखोर रस्ते अडवून ठेवतात. परिणामी महत्वाचे व तत्काळ काम असणाऱ्या नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. बुलडाणा शहरातील तहसील चौक, एडेड चौक, संगम चौक, जांभरुण रोड व आता रस्ता दुभाजक उभारणे सुरु असल्याने बाजार लाइनही अस्ताव्यस्त झाली आहे. विष्णुवाडी जवळील गजानन महाराज मंदिर येथेही अशीच वाहतुकीची परिस्थिती आहे. सर्क्युलर रोडवरही वाहतूक वाढली असून हाच प्रकार चिखली रस्त्यानेही रहदारी वाढल्याचे दिसून येते. जांभरुण रोड हा दवाखाने असलेला मोठा भाग आहे. या रस्त्यावर दररोज कोंडी होते. नगर पालिकेने वाहनतळाची व्यवस्था केलेली नसल्याने लोकांना त्याचा त्रास होत आहे. शहरात कुठेच पार्किंगची व्यवस्था करण्यात आली नाही.