जिल्हा कृषी अधीक्षक ढगे यांच्यावर गंभीर आरोप करीत तुपकर बसले कॅबिनमधे
बुलढाणा, २६ सप्टेंबर (गुड इव्हिनिंग सिटी): शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आज जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात अचानक जात आंदोलन सुरू केल्याने कृषी विभागात एकच खळबळ उडाली होती. प्रलंबित पीक विम्याच्या प्रश्नासंदर्भात रविकांत तुपकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सरकारकडून वारंवार तारीख पे तारीख देण्यात येत असल्याच्या धोरणाचा निषेध तुपकर यांनी केला आहे. १५ सप्टेंबर पर्यंत पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असा शब्द कृषी सचिवांनी याआधी दिला होता, तो शब्द सरकारने पाळला नाही म्हणुन तुपकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. जिल्हा कृषी अधीक्षक मनोज ढगे यांच्या कार्यालयात तुपकर अंथरूण आणि पांघरून सोबत घेऊन गेले. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विम्याचे पैसे पडत नाहीत तोपर्यंत आपण इथेच मुक्काम करणार आहोत असे म्हणत रविकांत तुपकर यांनी ठिय्या मांडला आहे. रविकांत तुपकर यांनी जिल्हा कृषी अधीक्षक मनोजकुमार ढगे यांना चांगलेच फैलावर घेतल्याचे दिसून आले. तुपकर यांनी जिल्हा कृषी अधीक्षक मनोजकुमार ढगे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. जिल्हा कृषी अधीक्षक मनोजकुमार ढगे आणि पीक विमा कंपनीचे साटेलोटे आहे. म्हणून ढगे हे त्या कंपन्यावर कारवाई करीत नाही. शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा न देता काही शेतकऱ्यांना टाकतात. तर काहींना टाकत नाही. त्यामुळे अनेक शेतकरी हे पीक विम्यापासून वंचीत राहत असल्याने तुपकर हे चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. पीक विम्याचा पंचनामा करण्यासाठी गेले पीक वीमा कर्मचारी पैश्याची मागणी करीत असल्याचे अनेक पुरावे तुपकरांनी जिल्हा कृषी अधीक्षक मनोजकुमार ढगे यांच्यापुढे सादर केले. तुपकर दुपारी अचानक जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात दाखल झाल्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चांगलीच तारंबळ उडाली होती. काही वेळा नंतर मोठ्याप्रमाणात पोलिस तैनात करण्यात आले आहे.