बुलडाणा, 10 ऑक्टोबर (गुड इव्हिनिंग सिटी/रणजीतसिंग राजपूत) :- खूप कठीण पेपर नसतो तसेच यात नापास झाले तरी पुन्हा पास होण्याची संधी असते, तरीही नर्सिंगचे प्रशिक्षण घेत असलेल्या 21 भामट्यांनी पेपर फोडून गैरप्रकार केल्याची खळबळजनक घटना आज बुलढाणा शहरात उघडकीस आली. सदर प्रकरणात 4 भावी अधिपरिचारक आणि एक अधिपारिचारिका यांच्याविरोधात पोलिस तक्रार होणार असल्याची गुड इव्हिनिंग सिटीला माहिती मिळाली आहे.
आज संपूर्ण राज्यभरात जीएनएमच्या अर्थात जनरल नर्सिंग अॅण्ड मिडवायफरीच्या द्वितीय वर्षाची म्हणजे फायनल परीक्षा होती. बुलढाण्यात दोन ठिकाणी परीक्षा केंद्रे देण्यात आलेली आहेत. यात एक म्हणजे जिल्हा सामान्य रूग्णालयातील नर्सिंग कॉलेज आणि दूसरे येळगांव येथील पैनगंगा नर्सिंग कॉलेज, अशी दोन केंद्रे आहेत. बुलढाणा शहरात किमान 8 ते 10 नर्सिंग कॉलेज आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरातील नर्सिंग सेंटरवर 103 विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते. यात विविध कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. आज मेंटल हेल्थ नर्सिंग 75 मार्कांचा पेपर होता. दरम्यान पेपर सोडविणार्या एका विद्यार्थ्याच्या शर्टाच्या बाहीवर उत्तर लिहीलेले आढळले. या कॉपीबहाद्दराला जेव्हा रूममधील पर्यवेक्षकांनी उभे केले आणि कॉपी चेक केली तेव्हा आढळले की, परीक्षेमधील प्रश्न आणि त्याची कॉपी सेम आहे. पेपर फूटला की काय, अशी शंका परीक्षा केंद्र अधिकार्याला वाटल्यानंतर त्यांनी सदर विद्यार्थ्याला बाहेर काढून त्याचा मोबाईल चेक केला तेव्हा त्याच्या मोबाईलमध्ये आजचा पूर्ण पेपर आढळून आला. तत्काळ ही बाब महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ नर्सिंग अॅण्ड पॅरामेडीकल एज्युकेशन मुंबईला कळविण्यात आली. त्यांनी इतर संशयीत विद्यार्थ्यांचे मोबाईल तपासायची परवानगी दिल्यानंतर परीक्षा केंद्र अधिकार्यांना तब्बल 21 जणांच्या मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिका मिळून आली. यातील 16 जणांकडे केवळ प्रश्न उत्तरे होती तर पाच जणांकडे अख्खा पेपर मिळून आला. यात विविध कॉलेजचे विद्यार्थी आहेत. जो पहिला पकडला गेला तो मदर तेरेसा नर्सिंग स्कूलचा विद्यार्थी आहे. त्याचे चार मित्र आणि एक विद्यार्थिनी असे पाच जणांची चौकशी सुरु आहे.
प्रभारी परीक्षा अधिकारी मीना येस्कर-शेळके यांच्याशी गुड इव्हिनिंग सिटीने संपर्क साधून सदर प्रकाराबाबत विचारणा केली असता त्यांनी पेपर लिक झाल्याचा संशयाला दुजोरा दिला असून पोलिस तक्रार होणार असल्याचे सांगितले. परंतु विद्यार्थी, कॉलेज किंवा इतर माहिती देण्यास नकार दिला.
बुलढाण्यातून पेपर लिकच्या बातमीने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली असून सदर प्रकरणात पोलिस तक्रार दाखल करण्याचे आदेश राज्य नर्सिंग बोर्डाने दिले आहेत. तक्रारीनंतर तपासादरम्यान पेपर फूटीचे हे धागेदोरे कुठपर्यंत पसरलेले आहेत, हे समोर येईलच. गुड इव्हिनिंग सिटीकडे सदर विद्यार्थ्यांची नांवे उपलब्ध झाली की कॉलेजसह प्रकाशित करू.