spot_img

सिंदखेडराजामध्ये महायुतीला दिवाळीपूर्वीच फटाके .. राष्ट्रवादीकडून मनोज कायंदे रिंगणात !

डॉ. शशिकांत खेडेकर यांचे काय होणार ?

बुलढाणा, 29 ऑक्टोबर (गुड इव्हिनिंग सिटी) ः राजेंद्र शिंगणे यांनी शरद पवार गटात उडी मारल्यामुळे महायुतीला पहिला धक्का बसला होता. आता या जागेवर महायुतीने काल संध्याकाळी डॉ. शशीकांत खेडेकर यांना शिंदे शिवसेना गटाकडून उमेदवारी घोषित केली होती. आता याच जागेवर राष्ट्रवादी अजीत पवार गटाने मनोज कायंदे यांना उतरविले आहे. काल मध्यरात्रीनंतर झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर माजी जि.प. नंदाताई कायंदे यांचे चिरंजीव मनोज कायंदे काँग्रेसमधून राष्ट्रवादीत प्रवेश करीत असून अजीतदादा पवार यांनी ही खेळी खेळली आहे. डॉ. शिंगणे यांचे वेळेवर सोडून जाणे अजीतदादा यांना पटलेले नाही. अजीत पवार यांचाच सिंदखेडराजाच्या जागेवर दावा होता. तुमच्याकडे उमेदवार नसल्याचे कारण देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खा. प्रतापराव जाधव यांनी डॉ. शशिकांत खेडेकर यांना पुढे केले. दोन दिवसांपूर्वी डॉ. शशिकांत खेडेकर अजीतदादा यांच्या पक्षाकडून लढण्यासाठी मुंबईत ठाण मांडून होते. परंतु मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेलाच जागा सोडा, म्हणून आग्रह धरला. काय राजकीय वाटघाटी झाल्या, याची कल्पना नाही परंतु डॉ. शशिकांत खेडेकर यांना महायुतीचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले. या बातमीला काही तास उलटत नाही तोच आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मनोज कायंदे यांना अजीतदादांनी उमेदवार म्हणून पुढे आणले आहे. थोड्याच वेळात मनोज कायंदे यांचा प्रवेश होवून ते राष्ट्रवादीमय होणार आहे. त्यानंतर अर्ज भरला जाईल. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष टी.डी. अंभोरे यांनी सदर घडामोडींमध्ये महत्वाची भूमिका निभावल्याचे कळते. मनोज कायंदे यांचे वडील देवानंद कायंदे यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले आहे. वंजारी समाजामध्ये स्व. देवानंद कायंदे यांना सन्मानाचे स्थान आहे. जर डॉ. शशिकांत खेडेकर यांनी अर्ज मागे घेतला नाही तर डॉ. शिंगणे आणि डॉ. खेडेकर असे दोन मराठे होतील. आता अर्ज मागे घेण्याच्या तारखेपर्यंत आणखी काय होईल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. सिंदखेडराजात महायुतीला मात्र दिवाळीपूर्वीच फटाके लागल्याचे स्पष्ट होत आहे.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत