भेसळखोरांची दिवाळी
बुलडाणा, 30 ऑक्टोबर (गुड इव्हिनिंग सिटी ): दिवाळीत मिठाई बनवत असताना जो खवा आपण विकत घेतोय तो शुद्ध आहे की अशुद्ध याची खात्री करून घ्या कारण अन्न व औषध प्रशासनाने नांदुरा येथे जवळपास 149 किलो भेसळयुक्त खवा जप्त केला आहे. खव्याच्या या बातमीने खवय्येगिरी करणाऱ्यांच्या मनात मात्र धडकी भरली आहे.
जिल्ह्यात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात दुग्धजन्य पदार्थाची विक्री केली जाते. यात अनेकवेळा भेसळ ही असते, ही भेसळ होवू नये याकरीता अन्न व औषध प्रशासनाने विशेष तपासणी मोहीम सुरु केली आहे. या विभागाने नुकतेच नांदुरा येथे भेसळयूक्त असल्याच्या संशयावरुन 149 किलो खवा जप्त केला आहे. तसेच भेसळ थांबवण्यासाठी विशेष नियंत्रण समिती देखील गठित केली आहे.
जिल्ह्यात दिवाळीनिमित्त मिठाई व गोडधोड पदार्थ बनविण्यासाठी दूध व दुग्धजन्य पदार्थाचा वापर केला जातो. तर खवा, बर्फी, मावा, पेढा, मिठाई बनविण्यासाठी लागणारे दूध व खवा सारख्या पदार्थामध्ये अनेकवेळा भेसळ केली जाते. ही भेसळ रोखण्यासाठी भेसळ नियंत्रण समितीच्या वतीने जिल्हाभरात तपासणी मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेत दूध व दुग्धजन्य पदार्थ, मिठाई, खादयतेल, तूप, फरसारण, रवा, बेसन आदी पदार्थांचे संशय असल्याने 22 नमूने जिल्ह्यातील मलकापूर, नांदुरा आणि सिंदखेड राजा, देऊळगाव राजा येथून घेण्यात आले आहे. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी जी.के.वसावे, जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी डॉ.डी.एन.काळे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली असून यावेळी नांदुरा रेल्वेस्थानक परिसरात ही तपासणी करण्यात आली.
नागरिकांनी सणासुदीत खबरदारी घ्यावी
सणासूदीतील दूध व दुग्धजन्य पदार्थांना अधिक मागणी असते. हे लक्षात या पदार्थामध्ये भेसळ करण्याची शक्यत वाढते. त्यासाठी समितीने जिल्हास्तरावर विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. नागरिकांनीही खबरदारी बाळगावी, असे आवाहन प्रमोद पाटील, सहायक आयुक्त, अन्न व प्रशासन यांनी केले आहे.