जयश्रीताई आणि पतिची मिळून एकुण संपत्ती 12 .5 कोटी
पतिवर दोन कोटींचे कर्ज
बुलढाणा, 30 ऑक्टोबर (गुड इव्हिनिंग सिटी / रणजीतसिंग राजपूत) : कुणालाही आश्चर्याचा धक्का बसू शकतो की, सत्ताधारी आमदार संजय गायकवाड यांची संपत्ती अडीच कोटींनी घटली कशी ? सहा महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणूकीवेळी 30 मार्च रोजी जेव्हा आ. गायकवाड यांनी खा. प्रतापराव जाधव यांच्यापूर्वी उमेदवारी दाखल करून खळबळ उडवून दिली होती, तेव्हा त्यांनी दिलेल्या शपथपत्रानुसार त्यांची एकुण संपत्ती 5 कोटी 55 लक्ष रुपये होती. मात्र विधानसभा निवडणूकीचा अर्ज भरतांना आ. संजय गायकवाड यांनी दिलेल्या शपथपत्रात त्यांची एकुण संपत्ती 3 कोटी 12 लाख 7 हजार 837 रुपये आहे. म्हणजेच 2 कोटी 42 लाख 92 हजार 163 रुपयांनी आ. गायकवाड यांची संपत्ती झाली आहे. केवळ सहा महिन्यातच असे कुठले नुकसान आ. गायकवाड यांना झाले की, त्यांची संपत्ती जवळपास अडीच कोटींनी कमी झाली. अर्थात याचे कारणही सोपे आहे. सहा महिन्यांपूर्वीच्या शपथपत्रात म्हणजेच अॅफीडीव्हेटमध्ये आ. गायकवाड यांनी त्यांच्यावर अवलंबून असणार्यांमध्ये मृत्यूंजय आणि पृथ्वीराज या दोघांची नांवे टाकली होती. आता मात्र ही दोन्ही नांवे वगळून टाकण्यात आली आहे. त्यातील एकट्या मृत्यूंजय गायकवाड यांच्या नावावर 1 कोटी 25 लाख रुपयांची संपत्ती दर्शविलेली होती. तर द्वितीय पुत्र पृथ्वीराज यांच्या नावावर 27 लक्ष रुपयांची संपत्ती होती. विशेष म्हणे मृत्यूंजय गायकवाड यांनी कालच, चिखली विधानसभेसाठी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार अॅड. जयश्रीताई सुनिल शेळके यांची कौटूंबिक संपत्ती एकुण 12 कोटी 62 लाख आहे. त्यातील जयश्रीताईंच्या नावावर केवळ 42 लाख 52 हजार 660 रुपयांची संपत्ती आहे.
लोकवर्गणीतून 2019 ची विधानसभा निवडणूक लढविणारे आमदार संजय गायकवाड आता 3 कोटी 12 लक्ष रुपयांचे मालक आहेत. अर्थात यातील मोठा वाटा त्यांना वडीलोपार्जीत वारसा हक्काने मिळालेली शेती आणि त्या शेतीत करण्यात आलेल्या प्लॉटिंगची बाजारभावानुसार किंमत 1 कोटी 44 लाख रूपये आहे. तसेच त्यांना आमदार म्हणून दरमहा मिळणारे 1 लाख 86 हजार रुपयांचे वेतनामुळे त्यांच्या संपत्तीत वाढ झाल्याचे दिसून येते. याशिवाय शेती हे उत्पन्नाचे साधन असल्याचे आ. गायकवाड यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात म्हटले आहे. 2019 मध्ये आ. गायकवाड यांची संपत्ती 1 कोटी 63 लाख रुपये होती आणि त्यांच्यावर 39 लाख रुपयांचे कर्ज होते. 2014 मध्ये जेव्हा त्यांनी मनसेकडून उमेदवारी दाखल केली होती तेव्हा त्यांच्याकडे केवळ 15 लाख रुपयांची संपत्ती होती. त्यातही 14 लाख रुपयांचे बुलढाणा अर्बनचे कर्ज होते. आज रोजी त्यांच्यावर 91 लाख रुपयांचे वाहन कर्ज आहे. आ. गायकवाड यांनी काल, गुरुवार 28 मार्च रोजी लोक सभेसाठी शिवसेना पक्ष लिहीत अपक्ष उमेदवारीचे नामांकन दाखल केले. त्यावेळी अर्जासोबत नियमाप्रमाणे एक शपथपत्रही दिले आहे. त्या शपथपत्रात चल, अचल संपत्तीचे सविस्तार वर्णन तसेच गुन्हे, शिक्षण, इन्कम टॅक्स विवरण अशासंदर्भात माहिती देणे अनिवार्य असते. आ. संजय गायकवाड यांनी 2019 मध्ये विधानसभा निवडणूकीच्या वेळीही शपथपत्र दाखल केले होते. पाच वर्षांपूर्वी आणि कालच्या शपथपत्राची तुलना केली असता, त्यांच्या संपत्तीत तिपटीपेक्षा अधिक वाढ झालेली दिसत आहे. गुन्ह्यांच्या बाबतीत 57 वर्षीय आ. गायकवाड यांच्यावर बुलढाणा शहर पोलिस स्टेशनमध्ये दोन गुन्हे दाखल आहेत. एक प्रकरण 2012 आणि दूसरे 2017 मधील असल्याचे त्यांनी शपथपत्रात दिले आहे. न्यायालयात सुरु असलेल्या या दोन्ही प्रकरणांमध्ये त्यांच्यावर दंगा करणे, हत्यार घेवून दंगा करणे, खून करण्याचा प्रयत्न करणे, विना परवानगी हत्यार वापरणे असे गुन्हे दाखल आहेत. गुड इव्हिनिंग सिटीने यापूर्वीही इतर उमेदवारांच्या संपत्तीचे विवरण प्रकाशित केलेले आहे. आ. गायकवाड रोख स्वरुपात केवळ 50 हजार रुपये रक्कम आहे तर पत्नी सौ. पूजाताई यांच्याकडे नगदी 30 हजार आहेत. आ. संजय गायकवाड यांचे बुलढाणा आयसीआयसीआय बँकेत बचत खाते असून या खात्यात त्यांचे 5 लाख 70 हजार 239 रुपये जमा आहेत. तर याच बँकेत पूजाताई यांचे 5 लाख 27 हजार 983 रुपये जमा आहेत. मृत्यूंजय आणि पृथ्वीराज दोघांचेही आयसीआयसीआय बँकेत खाते आहेत. त्यात मृत्यूंजय यांच्याकडे 84 हजार 304 रुपये तर पृथ्वीराज यांच्या खात्यात केवळ 345 रुपये आहेत. एसबीआय बुलढाणा येथील शाखेत आ. गायकवाड यांचे 1 लाख जमा आहेत. तर सेंट्रल बँक ऑफ इंडीया बुलढाणा येथे त्यांच्या खात्यात 9161 रुपये आहेत. चिखली अर्बनमध्ये 14 हजार रुपये जमा आहेत. बुलढाणा अर्बनच्या बस स्टॅण्ड शाखेत त्यांची 7 लाख रुपयांची मुदत ठेव आहे. 2019 मध्ये आ. गायकवाड यांच्याकडे केवळ एकच वाहन होते. अॅम्बेसेडरचा उल्लेख त्यांनी केला होता. आता त्यांच्याकडे फॉरच्युनर (एमएच 28 व्ही 3132) किंमत 41 लाख रुपये आणि इन्होव्हा (एमएच 28 बीजे 3132) किंमत 31 लाख 5 हजार 525 रुपये, असे दोन चारचाकी आहेत.
शेतजमीन, प्लॉट, निवासी इमारत तसेच फ्लॅट याबाबतीत त्यांनी शपथपत्रात दिलेल्या विवरणानुसार बुलडाणा गट क्र. 44/03 मधील प्लॉट 1 ते 21 एकुण 38 हजार 3 स्क्वेअर फूट वारसा हक्काने मिळालेली जमीन अदमासे बाजार मूल्य 1 कोटी 23 लाख 18 हजार 710 रूपये इतके आहे. ही शेतजमीन त्यांची वडीलोपार्जित आहे. त्यांनी राजूर शिवारात शेती घेतलेली आहे. राजूरच्या गट नं 61 मध्ये आ. संजय गायकवाड यांची 4 एकर 21 गुंठे आणि राजूरच्या गट नं. 62 मध्ये पूजाताईची 3 एकर एक गुंठा अशी जमीन आहे. त्यांच्या अर्धांगिनी सौ. पूजाताई गायकवाड यांच्या नावावर मौजे महाळुंगी ता. मुळशी जि. पुणे येथील एव्हॉन व्हिस्टा ए 3 मध्ये फ्लॅट नं. 1901 असून ज्याची किंमत 1 कोटी 2 लाख 85 हजार 716 रुपये आहे.
मोताळ्यातील त्यांच्या फार्म हाऊसचा मात्र शपथपत्रात उल्लेख आढळला नाही. चल संपत्तीमध्ये काही आभूषणांचा समावेश होतो. आ. गायकवाड यांच्याकडे 16 ग्रॅम वजनाचा एक लाख रुपयांचा सोनाच्या गोफ आणि जवळपास 3 लाख 12 हजार रुपयांचे 41 ग्रॅम वजनाचे सोन्याचे रूद्राक्षवाले ब्रासलेट आहे. कॅश, सेव्हींग अकाऊंट, चारचाकी वाहने आणि आभूषणांची आ. संजय गायकवाड यांच्या कुटूंबाकडे एकुण संपत्ती 1 कोटी 16 लाख रुपये आहे. गुड इव्हिनिंग सिटीला प्राप्त शपथपत्रानुसार आमदार झाले तरी संजय गायकवाड यांच्यावरील कर्ज फिटलेले नाही. वाहनासाठी आ. गायकवाड यांनी आयसीआयसीआय बँकेतून 21 लाख रुपये कर्ज घेतलेले आहे. तर बुलढाणा अर्बनच्या शाखेतूून त्यांनी 70 लक्ष रुपये कर्ज घेतलेले आहे. आ. गायकवाड यांचे शिक्षण शिवाजी हायस्कूल बुलढाणा येथून 9 वी पर्यंत झालेले आहेत. त्यांची बॅच 1982 ची आहे.
जयश्रीताई आणि पतिची मिळून एकुण संपत्ती 12 कोटी 62 लाख

उबाठा गटाच्या उमेदवार अॅड. जयश्रीताई यांनी त्यांचे स्वतःचे तसेच पति सुनिल, मुलगी अभिता आणि मुलगा क्षृगल मिळून कौटूंबिक संपत्तीचे विवरण त्यांनी आपल्या शपथपत्रात दिले आहे. इन्कम टॅक्स विभागाला दिलेल्या विवरणाप्रमाणे 2023-24 मध्ये 8 लाख 75 हजार 950 रुपये उत्पन्न होते. तर पति सुनिल शेळके यांचे उत्पन्न 2023-24 मध्ये 1 कोटी 30 लाख 59 हजार 175 आहे. जयश्रीताईंकडे 20 हजार रोख रक्कम आहे. येळगांवच्या सेंट्रल बँक ऑफ इंडीयामध्ये त्यांच्या खात्यात 3 लाख 43 हजार 660 रुपये आहेत. आयसीआयसीआय खारघार, राजश्री शाहू ग्रामिण शिरपूर याठिकाणी खाते काढण्यापुरती रक्कम खात्यांमध्ये दिसून येते. दिशा अर्बनमध्ये त्यांच्या खात्यात 3600 रुपये आहेत. तर त्यांनी एलआयसीची पॉलिसी काढली आहे. जिचे मूल्य 2 लाख 82 हजार आहे. त्यांच्याकडे सोन्याची एक आणि शॉर्ट अशा दोन गंठण आहेत. तीन बांगड्या आणि मंगळसुत्राचे लॉकेट तसेच छोटा गोफ, चैन, फॅन्सी टॉप्स, लटकन आणि गोफ पोत असे 4 लाख 39 हजार रुपयांचे सोने आहे. येळगांवमध्ये 2 एकर 5 गुंठे जमीन, जिचे आजच्या बाजारभावानुसार मूल्य 18 लक्ष आहे. त्यांचे शिक्षण जयश्रीताई यांचे शिक्षण 10 वी, 12 वी श्री शिवाजी विद्यालय चिखली येथे झाले असून त्यांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठ येथून एम.ए. पदवी प्राप्त केली आहे. याशिवाय श्रीरामभाऊ शेळके लॉ कॉलेज खामगांव मधून त्यांनी 2014 मध्ये त्या वकील झाल्यात.
उपजिल्हाधिकारी पदावरून सेवानिवृत्ती घेतलेले सुनिल शेळके यांनी अभिता लॅन्ड कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूक केल्याचे दिसून येत आहे. शपथपत्रात दिलेल्या विवरणानुसार बँकांमध्ये जमा रक्कम आणि मुदत ठेव मिळून एकुण 2 कोटी 37 लाख 30 हजार रुपयांची संपत्ती त्यांच्याकडे आहे. यात दोन सोन्याच्या अंगठ्या, चैन, गोफ यांचा समावेश आहे. सुनिल शेळके यांची मुक्ताईनगरमधील पारंबी याठिकाणी 3 एकर 25 गुंठे जमीन आहे. जांभरून, कर्जत, जि. रायगड 5 एकर 25 गुंठे जिचे मूल्य बाजारभावनुसार 1 कोटी 37 लाख 22 हजार 930 आहे, तर याचठिकाणी आणखी 6 एकर 24 गुंठे जमीन असून जिचे मूल्य एक कोटी 72 लाख आहे. खेलवरी जळगांव जामोद याठिकाणी 5 एकर 11 गुंठे जमीन असून जिचे मूल्य 1 कोटी 48 लाख 70 हजार असल्याचे नमूद करण्यात आहे. तर खामगांव तालुक्यातील नायदेवी येथे 5 लाख रुपये मूल्य असलेली 64 गुंठे जमीन आहे. 92722 स्न्वे.फूट 17 लाख रुपयांचा आणखी एक प्लॉट याठिकाणी आहे. भक्ताची वाडी, कर्जत जि. रायगड येथे 290625.58 चौ. फूट जमीन असून 2 कोटी 41 लाख 87 हजार 213 असे तिचे बाजार भावानुसार मूल्य आहे. शिवशंकर नगर मध्ये सन 2000 पासून निवासी ईमारत असून बांधकामासहित या ईमारतीचे मूल्य 40 लाख रूपये आहे. याचपरिसरात आणखी एक इमारत तेव्हढ्याच किंमतीची आहे. अर्थात सुनिल शेळके यांच्यावर दोन मोठी कर्जे आहेत. ज्यात एचडीएफसी बँक बुलढाणा 1 कोटी 20 लाख आणि राष्ट्रमाता जिजाऊ सहकारी पतसंस्था 81 लाख 64 हजार 307 रूपये, असा समावेश आहे. एकुण कर्जाची रक्कम 2 कोटी 2 लाख 50 हजार 871 रूपये आहे. अॅड. जयश्रीताई शेळके यांच्याकडे पतिची आणि स्वतःची संपत्ती मिळून 12 कोटी 62 लाख 53 हजार 620 रुपये आहे.