चिखलीतील ते 6 लाख कुणाचे ?
बुलढाणा, 31 ऑक्टोबर (गुड इव्हिनिंग सिटी/रणजीतसिंग राजपूत) ः निवडणूकांमध्ये अवैध पैशांचा वापर होवू नये, मतदारांना पैसे वाटून त्यांची मते विकत घेतली जावू नये, यासाठी निवडणूक विभागाच्या निर्देशानुसार बुलढाणा जिल्हाभरात तब्बल 35 एसएसटी पथके तैनात करण्यात आली आहेत. ठिकठिकाणी नाकाबंदी करून संशयास्पद आढळणार्यांची झाडाझडती घेतली जात आहे. यादरम्यान आज तीन विविध कारवाईमध्ये एकुण 1 कोटी 80 लाख रुपयांची रक्कम पकडण्यात आली. परंतु त्यातील दोन कारवाई व्यर्थ गेल्या. कारण पकडलेली रक्कम बँकांची निघाली.परंतु एका जणाकडून 6 लाख 5 हजार 775 रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई चिखली पोलिसांनी केली. ठाणेदार संग्रामसिंग पाटील स्वतः चेकपोस्टवर कडा पहारा ठेवून आहेत. चिखली शहरात शिवराणा अर्बन समोर नाकाबंदी करण्यात आली हहोती. यादरम्यान रामेश्वर मुक्तेश्वर बिडवे (वय 55) रा. खडकपुरा चिखली यांच्या ताब्यात 6 लाख रूपयांची रक्कम रोख स्वरूपात आढळी. सदर रकमेबाबत त्यांना कुठलेही समाधानकारक उत्तर देता आले नाही. त्यामुळे ठाणेदारांच्या पथकाने ही रोख रक्कम ताब्यात घेवून पुढील कायदेशीर कारवाईसाठी निवडणूक निर्णय अधिकारी चिखली विधानसभा यांना प्रकरण वर्ग केले. आणखी एक वाहन एक कोटी 64 लाख रुपयांची रक्कमसह जप्त करण्यात आले होते. परंतु ही रक्कम स्टेट बँक ऑफ इंडियाची होती. बुलढाण्याहून ही रक्कम दूसर्या शाखेत जमा करण्यासाठी नेण्यात येतत होती. अशीच एक कारवाई बोराखेडी पोलिसांनी केली असून बोराखेडी फाट्यावर दुपारी 12.30 वाजेदरम्यान चेकपोस्टवर पोलिसांच्या पथकाने एका संशयास्पद वाहनाला थांबविले होते. विशेष म्हणजे या पांढर्या व्हॅनमध्ये 10 लाख रुपयांची कॅशसुद्धा सापडली. परंतु चौकशीनंतर ही रक्कम सेंट्रल बँक ऑफ इंडीयाच्या मालकीची निघाली.