सर्वात कमी बुलढाणा ५७.९० टक्के तर सर्वाधिक ४७.३१ टक्के खामगांवमध्ये
जळगांवमध्ये प्रशांत डिक्कर यांच्यावर हल्ला ; दादागिरी, धमकावण्याचे छुटपूट प्रकार पण मतदान उत्स्फूर्तपणे !
बुलढाणा, २० नोव्हेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) जळगांवजामोद मतदारसंघाचे महापरिवर्तन आघाडीचे उमेदवार प्रशांत डिक्कर यांच्यावर आज सकाळी ६ वाजेदरम्यान जी वघेणा हल्ला झाला. त्यात ते बचावले. परंतु गंभीर जख्मी झाले. याशिवाय चिखली, बुलढाणा मतदारसंघात डोंगरखंडाळा, जांभरून तसेच बुलढाणा शहरात काही ठिकाणी दादागिरीचे प्रकार घडले. परंतु कुठेही पोलिस तक्रार झाली नाही. एकंदरीत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. निवडणूक निरीक्षकांनी स्वतःहून विविध गावातील मतदान केंद्रांवर भेट देवून आढावा घेतला. बुलढाणा जिल्ह्यातील सर्वच ७ मतदारसंघात प्रमुख लढत महाविकास आघाडी विरूद्ध महायुती राहिली. सिंदखेडराजा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे डॉ. राजेंद्र शिंगणे, महायुतीतील राष्ट्रवादी अजीत पवार गटाचे उमेदवार मनोज कायंदे आणि शिंदे गटाचे उमदेवार डॉ. शशिकांत खेडेकर या तिघांमध्ये चुरशीची लढत झाली. खामगांवमध्ये फुंडकर आणि सानंदा यांच्यात परंपरागत राजकीय कुश्ती पाहायला मिळाली. अॅड. आकाश फुंडकर आणि दिलीपकुमार सानंदा या दोघांमध्ये थेट लढत झाली. मेहकर मतदार संघात गेल्या तीन टर्मपासून आमदार असलेले डॉ. संजय रायमूलकर यांना महाविकास आघाडीचे डॉ. सिद्धार्थ खरात यांचे तगडे आव्हान मिळाले. चिखलीमध्ये श्वेताताई महाले यांना राहुल बोंद्रे यांनी जोरदार टक्कर दिली. तर मलकापूरमध्ये चैनसुख संचेती आणि आ. राजेश एकडे यांच्यात तुल्यबळ निवडणूक झाली. बुलढाणा मतदारसंघात आ. संजय गायकवाड यांच्यासाठी निवडणूक कठीण झाली. उमेदवार अॅड, जयश्रीताई शेळके यांच्यामुळे निवडणूकीची चुरस वाढली होती. लोकशाही विरूद्ध हुकूमशाही अशी बुलढाणा मतदारसंघाची लढत असल्याचे जयश्रीताई सातत्याने सांगत आल्या. तर ‘बुलढाणा मतदारसंघाचा बदललेला विकासात्मक चेहरा यालाच आ. गायकवाड यांनी प्रचाराचे साधन बनविले होते. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदानाच्या एकुण आकडेवारीनुसार बुलढाणा मतदारसंघ ५७.९० टक्के,चिखली ६२.२८, जळगांव जामोद ६३.३२, खामगांव ६७.३१, मलकापूर ६१.८५, मेहकर ६४.७६ तर सिंदखेडराजा ६२.५५ टक्के मतदान झाले. आणखी एका तासात प्रत्येक ठिकाणी ५ ते ७ टक्क्यांपर्यंत ही आकडेवारी वाढू शकते. दोन दिवसानंतर म्हणजे २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी आहे. उमेदवारांचे राजकीय भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद आहे. निकाल काय लागतो आणि कुणाचा ‘निकाल’ लागतो, यासाठी प्रत्येक मतदार निश्चीतच उत्सुक असेल.