बुलढाणा, 29 नोव्हेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) : येथील जांभरुण रोडवरील एका देशी दारूच्या दुकानासमोर दोन जणांमध्ये थोड्या वेळापूर्वी वाद झाला. या वादातून एकाने दुसऱ्याला चाकू मारला. या चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाला जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले असून घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षकांसह डिवायएसपी, शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी पोलीस ताब्यासह जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेतली. चाकूहल्ल्याच्या घटनेमागे राजकीय पार्श्वभूमीचा संशय वाटल्याने पोलिस मोठ्या संख्येत रुग्णालयात जमा झाले होते. परंतु घटना आपसातील वादातून झाल्याचे निष्पन्न झाल्यामुळे पोलिसांचा ताण हलका झाला. जखमी झालेल्या युवकाचे नाव जयपाल उर्फ चंद्रभान सोपान वाघ (36 वर्षे) असून तो बोरखेड, मोताळा येथील रहिवासी आहे. तो मजुरी करतो. त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सरकारी डॉ. रिंघे यांनी सांगितले. उसने घेतलेल्या 500 रुपयातून मोबाईल हिसका-हासकी झाल्यामुळे जयपाल आणि समोरच्या युवकात वाद चिघळला होता, अशी माहिती ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांनी गुड इव्हिनिंग सिटीला दिली.