यंदा ४ हजार ८९२ चा भाव : २०१२ मध्ये ४ हजार ३५० चा होता दर
बुलढाणा, ३० नोव्हेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) सध्या सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडला असून, सोयाबीनच्या दरात मोठी घसरण झाली आहे. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने मोठा फटका बसत आहे. एका बाजूला उत्पादनाचा खर्च वाढत आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला सोयाबीनला कमी दर मिळत आहे. बारा वर्षापुर्वी ४३५० रूपये सोयाबीनचे दर होते तर आता ४ हजार रूपये क्विंटलचा भाव मिळत आहे. म्हणून सोयाबीनला हमीपेक्षा कमी भाव; बारा वर्षापुर्वीचे दर बरे होते राव, असे म्हणायची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. यावर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांनी मे, जून महिन्यांत अत्यल्प पावसावर खरीप सोयाबीन, तूर, मूग, कापूस आदी पिकांची पेरणी केली होती. तीन महिने जेमतेम पावसावरच खरीप पिकांची मदार होती. मात्र, सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वच खरिपाची पीके पाण्याखाली गेली. जवळपास १०-१५ दिवस पिके पाण्याखाली होती. नंतर शेतकऱ्यांनी पिकाची कशीबशी काढणी केली. खरीप हंगामातील सोयाबीन बाजारात आल्यानंतर सोयाबीनचे दर घसरले आहेत. सोयाबीनचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेला असताना दुसऱ्या बाजूला सरकारने जाहीर केलेल्या दरापेक्षा कमी दराने शेतकऱ्यांना सोयाबीन विकावे लागत आहे. केंद्र सरकारने सुरू असलेल्या हंगामासाठी सोयाबीनला ४८९२ रूपये प्रतिक्विंटलचा हमीभाव जाहीर केला असताना सध्या शेतकऱ्यांना बाजारामध्ये ३५०० ते ४१०० रुपये प्रतिक्विंटल दराने सोयाबीन विकावे लागत आहे. सन २०१२ मध्ये सोयाबीनला ४३५० रूपयांचा दर मिळत होता. त्याच्या पावत्या देखील शेतकऱ्यांकडे उपलब्ध आहेत. दरम्यान, बारा वर्षात सोयाबीनला हमीपेक्षा कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी भविष्यात सोयाबीनचे दर वाढतील, या अपे- क्षेने सोयाबीन विक्री थांबविल्यात जमा आहे. शेतीमालाला भाव वाढण्याऐवजी कमी झाल्याचे चित्र सद्यस्थितीत दिसत असल्याने आता शेतकऱ्यांनी जगायचे कसे, असा प्रश्न निर्माण झालेला आहे.