बुलढाणा, 29 डिसेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) :- थोड्याच वेळात बागेश्वर धाम पिठाधीश्वर ईश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज श्री गावात दाखल होत असून केवळ एका तासापुरता त्यांचा हा दर्शन दौरा असल्याचे गुड इव्हिनिंग सिटीला सूत्रांकडून समजते. महत्त्वाचे म्हणजे बागेश्वर धाम सरकार शेगावात येणार ही बातमी सर्वप्रथम गुड इव्हिनिंग सिटीने आपल्या वाचकांपर्यंत पोहोचवली होती. श्री संत गजानन महाराजांचे दर्शन घेऊन संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा आणि विविध उपक्रमांची माहिती घेणे हा उद्देश धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा आहे. या ठिकाणी कुठलाही दरबार भरणार नसल्याचे बागेश्वर धामच्या सूत्रांकडून कळते. पुढील काही क्षणांमध्ये जळगाव एअरपोर्ट वरून बागेश्वर धाम सरकारचे हेलिकॉप्टर शेगावमध्ये पोहोचणार आहे. माऊली इंजिनिअरिंग कॉलेजच्या परिसरामध्ये हेलीपॅड ची व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे धीरेंद्र शास्त्री महाराज दुपारी 3:00 वाजेच्या पूर्वी शेगाव चा दौरा आटोपून पुन्हा जळगाव कडे प्रस्थान करणार आहेत. संभाव्य गर्दी लक्षात घेता जिल्हा पोलीस प्रशासनाने दौरा स्थळ मार्गावर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील गडा गावात असलेले “बागेश्वर धाम” हे स्वयंभू हनुमानजींच्या देवत्वासाठी देश-विदेशात प्रसिद्ध आहे. बागेश्वर धाम ही अनेक तपस्वींची दैवी भूमी आहे, जिथे नुसते दर्शन घेऊन लोकांना बालाजी महाराजांचे आशीर्वाद मिळतात. येथे बालाजी महाराज एका अर्जाद्वारे तुमची समस्या ऐकतात आणि धामचे पीठाधीश्वर, पूज्य धीरेंद्र कृष्ण शास्त्रीजी महाराज, ज्यांना जग बागेश्वर धाम सरकार या नावाने संबोधते, त्यांच्यामार्फत ते समस्यांचे समाधान मिळवतात.