बुलढाणा, 5 जानेवारी (गुड इव्हिनिंग सिटी) : लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून पत्रकारितेला गणले जाते. पत्रकारितेचे व्रत घेवून कल्याणकारी समाजाच्या निर्मीतीसाठी पत्रकार आयुष्य वेचतात. बातमीसाठी तहान-भूक विसरून प्रचंड धावपळ करणारा पत्रकार आपल्या शरीराकडे कमालीचे दुर्लक्ष करतो आणि मग त्याला अल्पवयातच विविध व्याधींशी झगडावे लागते. समाजासाठी समर्पीत असणार्या या घटकाच्या आरोग्याची काळजी घेणे समाजाचीच जबाबदारी आहे, या उदात्त जाणिवेतून बुलढाणा शहरातील डॉक्टरांच्या विविध संघटनांनी मिळून पत्रकार आणि पत्रकारांच्या कुटूंबियांसाठी आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन केले आहे. डिजीटल मिडीयाच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अनिल उंबरकर यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच कार्यकारीणीतील नविन सदस्यांच्या सत्कार समारंभ व पत्रकार आणि पत्रकारांच्या कुटूंबियांसाठी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
6 जानेवारी 2025 रोजी पत्रकार दिनी बुलढाणा येथील बस स्टॅन्ड जवळ असलेल्या पत्रकार भवनात सकाळी 9 ते 12 वाजता हे शिबीर होणार असून या शिबीरात रक्त तपासणी, ब्लड प्रेशर, शुगर, ईसीजी, सोनोग्राफी, अस्थिरोग, हृदयरोग, ऍसिडीटी, अपचन, पोटविकार यासारख्या विविध आजारांची तपासणी केली जाणार आहे. या शिबीराचा जिल्ह्यातील सर्व पत्रकार आणि पत्रकाराच्या कुटंबियांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे. बुलढाणा डेंटल असोसिएशन आणि जिल्हा सामान्य रूग्णालय यांच्या विशेष सहकार्याने आयोजित होत असलेल्या या शिबीराचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी यांच्या हस्ते होणार असून प्रमुख उपस्थिती अदिती अर्बनचे संस्थापक सुरेश देवकर, जिल्हा माहिती अधिकारी श्री राठोड, डेंटल असो.चे बुलढाणा अध्यक्ष डॉ. राजेश जतकर यांची राहणार आहे.