बुलढाणा, 19 जानेवारी (गुड इव्हिनिंग सिटी) ः जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील डॉ. दिलीपसिंग राजपूत यांच्या अवैध गर्भलिंग निदान केंद्र प्रकरणात 17 जानेवारी रोजी बुलढाणा शहरातील डॉ. विजय सोळंकी यांना जालना पोलिसांनी अटक केली होती. त्यांना 22 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.डॉ.विजय सोळंकी यांचे बुलढाणा येथील जांभरून रोडवर हॉस्पिटल आहे.
यामध्ये संशयित आरोपी मध्ये डॉ. मोहिनी विजय सोळंकी (सोळंकी हॉस्पिटल, बुलडाणा), डॉ. प्रमिला सोळंकी (रविदीप हॉस्पिटल, बुलडाणा), डॉ.संगिता देशमुख (देऊळघाट) यांच्या कडे ही संशयाची सुई जाताना दिसत आहे.
या प्रकरणात आता आरोपींची संख्या 27 झाली आहे. त्यापैकी 14 आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. भोकरदन येथील डॉ. दिलीपसिंग राजपूत यांच्या गर्भपात केंद्रात 7 जुलै 2024 रोजी जालना पोलिसांनी व आरोग्य विभागाच्या पथकाने छापा टाकला होता. प्रकरणात 15 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर चौकशीत एकएक नाव समोर येत गेले. त्यामुळे आता या प्रकरणात एकूण आरोपींची संख्या 27 झाली असून 12 आरोपींची त्यात वाढ झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. भोकरदन येथील या गर्भलिंग निदान प्रकरणात नेमका किती जणांचा सहभाग आहे. किती गर्भपात केले गेले आहेत. कोण कोण संपर्कात आहेत. पैशाची देवाणघेवाण कशी झाली याची उत्तरे जालना पोलिस शोधत आहेत. या प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या नाना सहाणेला अटक झाल्यानंतर प्रकरणाची व्याप्ती वाढत असल्याचे चित्र आहे. आरोग्य विभागही ’अलर्ट’ आहे.
जालना पोलिसांच्या तपासामध्ये 17 जानेवारी रोजी अटकेत असलेल्या या प्रकरणातील एक प्रमुख आरोपी नाना सहाणे याच्या चौकशीत बुलढाणा येथील डॉ. विजय सोळंकी यांचे नाव समोर आले होते. जालना पोलिसांच्या एका पथकाने त्यांना अटक केल्यानंतर 18 जानेवारी रोजी जालना जिल्ह्यातील न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. डॉ. विजय सोळंकी यांना जालना पोलिस दलातील तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक योगेश उबाळे, धीरज भोसले, योगेश सहाणे, सोपान क्षीरसागर व चालक सौरभ मुळे यांनी ताब्यात घेतले होते
न्यायालयात काही संशयित आरोपींची नावे सादर केली आहेत. यात डॉ.राजेंद्रकुमार ऊर्फ राज काशीनाथ सावंत (रा. जाधववाडी, छत्रपती संभाजीनगर), डॉ. मोहिनी विजय सोळंकी (सोळंकी हॉस्पिटल, बुलडाणा), डॉ. प्रमिला सोळंकी (रविदीप हॉस्पिटल, बुलडाणा), डॉ. सुलक्षणा अग्रवाल (अग्रवाल हॉस्पिटल, चिखली, जि. बुलडाणा), डॉ. संगीता देशमुख-देऊळघाट, डॉ. दीपिका थत्ते (थत्ते हॉस्पिटल, गांधी चमन, जालना), डॉ. सुनीता सुभाष सावंत (सावंत हॉस्पिटल, भोकरदन, जि. जालना), डॉ. रवी वाघ (रविदीप हॉस्पिटल, भोकरदन), छत्रपती संभाजीनगर साकोळकर हॉस्पिटलमधील डॉक्टर, मीरा सिस्टर (रा. जालना), जायदा बेगम (रा. छत्रपती संभाजीनगर), सुधाकर हिवाळे (रा. भोकरदन) यांचा समावेश असल्याचे तपास अधिकारी योगेश उबाळे यांनी सांगितले.