बुलढाणा, 25 जानेवारी (गुड इव्हिनिंग सिटी) ः शांतता आणि सुव्यवस्थेसाठी धोका ठरणारा शहरातील आंबेडकर नगर परिसरातील दारूसम्राट संजय श्यामराव पवार वय 43 वर्ष यास एमपीडीए कायद्यान्वये एका वर्षासाठी बुलढाणा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्याच्या कार्यात बाधा निर्माण करणार्या आणि सामाजिक शांततेसाठी धोकादायक ठरणार्या गावगुंडांच्या विरोधात एमपीडीए कायदा ब्रम्हास्त्र सिद्ध झाले आहे. एमपीडीए अर्थात महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड कायद्यान्वये कार्यवाहीची प्रक्रिया सोपी नाही. त्यासाठी भरमसाठ पुरावे आणि तांत्रिक बाबींची पूर्तता करावी लागते. बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांनी सदरची प्रक्रिया पूर्ण तर केलीच परंतु मोठी हिम्मत दाखवत एम पी डी ए अॅक्टचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने संजय पवारला स्थानबद्ध करण्याचा धाडसी निर्णय घेतला
संजय श्यामराव पवार रा. डोंगर खंडाळा ता. जि. बुलढाणा ह.मु. आंबेडकर नगर, टीव्ही सेंटर जवळ, बुलढाणा यास सार्वजनिक सुव्यवस्थेच्या दृष्टीकोणातुन कोणत्याही प्रकारचे नुकसानदायक कृत्यापासुन परावृत्त करण्याकरीता महाराष्ट्र झोपडपटटी गुंड, हातभटटीवाले, औषधीविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणार्या व्यक्ती (व्हीडीओ पायरेट्स) वाळु तस्कर आणि अत्यावश्यक वस्तुचा काळा बाजार करणार्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतचा अधिनियम 1981 (1981 चा महा कायदा क्र.एलव्ही) च्या कलम 3 (1) अंतर्गत स्थानबध्द करण्यात आले आहे.
अवैध दारु विक्रीचा व्यवसाय करीत असे, त्यांचेवर पोलीसांनी छापे टाकुन वेळोवेळी कारवाई केलेली आहे परंतु त्याचे वर्तनात सुधारणा झाली नाही. त्याच्या अवैध दारू व्यवसायामुळे तरुण मुले, दारुच्या आहारी जावुन व्यसनाधीन झालेले आहेत. नमुद इसम सराईत असुन सदर इसम हा बुलढाणा शहर पोलीस स्टेशन हददीतील आंबेडकर नगर व आजुबाजुच्या परीसरामध्य आर्थिक फायद्यासाठी दारु विक्री करण्यासाठी दारुचे अनेक गुत्ते / अड्डे चालवित होता तर काही गुत्ते तो स्वतः चालवितो. दारु विक्री व वाहतुक यासारखे गुन्हे करण्यात तो गुंतलेला आहे. तसेच तो त्याचे साथीदारांसह वाहनाव्दारे दारुची वाहतुक करताना भरधाव वेगाने वाहन चालवितो. त्यामुळे रस्त्याने येणारे व जाणारे लोक व परीसरातील इतर लोक यांचे जिवीतास धोका निर्माण झाला होता. त्याच्या अवैध दारू व्यवसायामुळे परीसरात दुर्गंधी पसरुन परीसरात अस्वच्छता व रोगराईचे वातावरण निर्माण झाले आहे. वरील सर्व प्रकारच्या बाबी शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांनी जिल्हादंडाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिल्या. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनीही कायदा आणि सुव्यवस्थेला सर्वतोपरी महत्व देत संजय पवार विरोधात एम पी डी अॅक्ट अंतर्गत कारवाई केली. विशेष म्हणजे सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी, डीवायएसपी सुधीर पाटील आणि एलसीबी प्रमुख श्री लांडे यांच्या मार्गदर्शनात झाली.