म्हणाल्या ‘मराठा नेतृत्व म्हणून वेळोवेळी अपमान’
बुलढाणा, 4 फेब्रुवारी (गुड इव्हिनिंग सिटी/रणजीतसिंग राजपूत) ः अजीतदादांच्या राष्ट्रवादीतील मोठी धुसफूस महिला जिल्हाध्यक्षांच्या राजीनाम्यामुळे समोर आली आहे. अनुजाताई सावळे पाटील यांनी दीड महिन्यापूर्वीच प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांच्याकडे लिखीत स्वरूपात राजीनामा दिलेला आहे. परंतु हे राजीनामा पत्र आज अनुजाताईंनी आपल्या सोशल मिडीया अकाऊंटवरून जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीसह जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. खळबळ उडण्याचे एकमेव कारण म्हणजे राजीनामा देणार्या अनुजाताईंनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करीत काझी यांनी त्यांचा वेळोवेळी अपमान केला असल्याचे म्हटले आहे. आपल्या राजीनामापत्रात त्या लिहीतात की, गेल्या 4 वर्षांपासून निष्ठेने आणि प्रामाणिकपणे त्या महिला संघटनेचे काम करीत आहेत. परंतु जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी यांच्या सततच्या अपमानजनक वागणूक, होणारा मानसिक, सामाजिक त्रास, माझ्याबद्दलच्या चुकीच्या कामाच्या निष्ठेबद्दलच्या अफवा पसरवणे, या सगळ्यांना कंटाळून मी महिला जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे, असे त्यांनी म्हटले आहे. अनुजाताई पुढे म्हणतात की, पक्षात निष्ठावान लोकांना डावलून पक्ष संघटना टिकणार नाही. जातीयवाद फोफावला तर सामान्यांना न्याय मिळणार नाही. मराठा समाजातील सक्षम महिला म्हणून अश्या प्रकारे राजीनामा द्यावा लागणे निराशाजनक आहे, अशा स्वरूपाचे गंभीर विधानही त्यांनी सदर राजीनामा पत्रात केले आहे. उपमुख्यमंत्री अजीतदादा पवार आणि ज्येष्ठ नेते सुनिल तटकरे या दोघांना राजीनाम्याची प्रत पाठविण्यात आली होती. अनुजाताईंनी आज राजीनामा पत्र सोशल मिडीयावर पोस्ट केल्यानंतर जिल्हाभरात ते व्हायरल झाले आहे. अॅड. नाझेर काझी यांच्यावर अनुजाताईंनी आपल्या राजीनाम्याचे खापर फोडले आहे. अॅड. काझी आपल्यावरील आरोपांचे काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.