• प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते थाटात झाला प्रवेश
बुलढाणा, 11 फेब्रवारी (गुड इव्हिनिंग सिटी/रणजीतसिंग राजपूत) ः शहराच्या राजकारणात नवा रंग भरणारी मोठी घडामोड आज घडली आहे. मागील चार दशकांपेक्षा अधिक केवळ आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर राजकारणात घट्ट पाय रोवून असलेल्या मुन्ना बेंडवाल अर्थात मुन्नाभैय्यांनी ‘जय रामजी की..’ म्हणत भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे. पद असो किंवा नसो नेहमी चर्चेत असलेले नेते म्हणजे सुरेश सिनकर.. सिनकर यांनीही ‘सिना तानके’ भाजपमध्ये प्रवेश घेतला. आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते आणि बुलढाणा जिल्ह्यातील भाजप नेत्यांच्या उपस्थितीत महाप्रवेश पार पडले. त्यात या दोघांव्यतिरीक्त इतरही अशा नावांचा समावेश आहे, हे येणार्या नगर परिषद निवडणूकीची हवा बदलण्याची क्षमता ठेवतात.
आज, 11 फेब्रुवारी रोजी बुलढाणा शहरातील विविध पक्षात असलेल्या पदाधिकार्यांच्या त्यामध्ये माजी जि.प. सदस्य सुरेश सिनकर,माजी शिवसेना शहर प्रमुख मुन्ना बेंडवाल, ऑल इंडिया मल्हार युवा संघटना अध्यक्ष नंदू लवंगे ,माजी शिवसेना शहर प्रमुख नारायण हेलगे,माजी पंचायत समिती सदस्य विशाल सोनुने, मिलिंद कुलकर्णी, निलेश आवडकर, शुभम सिनकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी महसूल मंत्री भाजपा प्रदेशाध्यक्ष ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते भाजपा नेते महाराष्ट्र माजी मंत्री आमदार डॉ. संजय कुटे,महाराष्ट्राचे कामगार मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे संपर्कमंत्री ना.आकाश फुंडकर यांच्यासह जिल्ह्यातील भाजपा आमदार तसेच भाजपा बुलढाणा विधानसभा प्रमुख योगेंद्र गोडे ,भाजपा प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन मुंबई येथे भाजपात प्रवेश केले.यावेळी महसूल मंत्री तथा भाजपा प्रदेशाध्यक्ष ना.चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपा चे रुमाल टाकून प्रवेश घेणार्या सर्वांचे भाजपा परिवारात स्वागत केले.माध्यमांशी बोलतांना या प्रवेशामुळे आगामी होणार्या स्वराज्य स्थानिक संस्थेच्या निवडणुकीत बुलढाणा शहर व ग्रामीण भागातील भारतीय जनतापार्टी ला फायदा होणार असल्याचे विश्वास भाजपा नेते योगेंद्र गोडे यांनी व्यक्त केले आहे. या प्रवेश सोहळ्याला भाजपा अल्पसंख्याक प्रदेश महामंत्री मुस्ताक भाई दळवी,भाजपा शहर उपाध्यक्ष नितीन बेंडवाल, वैभव इंगळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
कट्टर हिंदूत्ववादी म्हणून मुन्ना बेंडवाल यांना ओळखले जाते. माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या सोबत बिनसल्यानंतर त्यांनी अपक्ष विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यानंतर त्यांनी भाजप सोबत जात बुलढाणा नगर पालिकेची निवडणूक लढवली होती. बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा ते शिवसेनेत आले. परंतु शिवसेनेत त्यांच्या नेतृत्वाला बहर आली नाही. ते राजकीय वनवासात असताना त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेत आज पक्षप्रवेश केला
देऊळघाट येथील व अपक्ष लोकसभा निवडणुक लढलेले धनगर समाजाचे युवा नेते म्हणून आपली ओळख निर्माण करणारे नंदू लवंगे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. नंदू लवंगे हे आ.संजय गायकवाड यांच्या निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. परंतु लोकसभा निवडणुकीनंतर ते आ.गायकवाड यांच्या पासून दुर गेले. त्यामुळे मुन्ना बेंडवाल व नंदू लवंगे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा पक्षप्रवेश केला असेल तर शिवसेनेसाठी ही डोकेदुखी ठरेल का ? अशी चर्चा रंगू शकते. अर्थात शिवसेना आणि भाजपा हे मित्रपक्ष असल्यामुळे पक्षप्रवेशानंतर दोन्ही पक्षांमध्ये धुसफूस वाढण्याची शक्यता कमी आहे.
———————-