बुलढाणा, 12 फेब्रुवारी (गुड इव्हिनिंग सिटी/रणजीतसिंग राजपूत) :
काय चूक होती तिची ? उराशी अनेक स्वप्ने घेवून त्यांच्या पूर्तीसाठी जीवाचे रान करीत असतांना स्नेहल गेली.. अवघ्या 22 वर्षाची स्नेहलचा अपघातात बळी गेला.. आईसोबत स्कुटी घेऊन घरी येत असताना, त्रिशरण चौकात बोलेरो पीक अप चालक याने दारूच्या नशेमध्ये, बेदरकार पणे गाडी चालवत, पाठीमागून येऊन भरधाव वेगाने धडक दिल्याने स्नेहल खाली पडली आणि सदर चालकाने आपली गाडी न थांबवता तिच्या शरीरावरून भरधाव वेगाने गाडी नेल्यामुळे तिचा जागीच तडफडून मृत्यू झाला… एका बापाची मुलगी गेली.. भावाची बहीण गेली.. एक माउलीने तीची एकुलती एक तरुण मुलगी डोळ्यासमोर गमावली… कु. स्नेहल संदीप चौधरी आता कधीच परतणार नाही.. 10 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजेदरम्यान सतिश बाहेकर या मद्यधुंद चालकाने स्नेहलचा बळी घेतला. या घटनेमुळे समाजभावना दुखावल्या असून जनतेमध्ये खूपच आक्रोश आहे. दुर्दैवाने अशी वेळ कुणावरही येऊ नये आणि सदर आरोपी चालकाला कठोरात कठोर शिक्षा मिळावी, या हेतूने स्नेहलच्या मित्रमैत्रीणी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी कँडल मार्च काढण्याचे ठरविले आहे. स्नेहलचे चांडक ले-आऊटमध्ये घर आहे. उद्या, 13 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6 वाजता चांडक ले-आऊटच्या बोर्डापासून ते त्रिशरण चौकापर्यंत कँडल मार्च काढण्यात येणार आहे. निवासस्थान ते अपघातस्थळ असा हा कँडल मार्च असून यात संवेदनशील नागरिकांनी मोठ्या संख्येत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.