येळगांवात प्रगटदिनी राजकीय पंगत !
बुलढाणा, 20 फेब्रुवारी (गुड इव्हिनिंग सिटी/रणजीतसिंग राजपूत) : राजकारणात सर्व काही क्षम्य असतं.. पण समाजकारणात जे उरलं सुरलं असेल तेही क्षम्य असतं.. म्हणजे आतून एकमेकांचे कितीही विरोधक असले तरी अनेक नेत्यांना सामाजिक कार्यक्रमांमध्ये एकत्रीत यावे लागते.. सामाजिक मंचावर एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसावे लागते.. एव्हढेच नव्हे तर पोळी, भाजी आणि बुंदीही वाढावी लागते.. आता आ. संजय गायकवाड, विजयराज शिंदे आणि रविकांत तुपकर यांनाच पहा न ! एरव्ही एकमेकांच्या सावलीतही गायकवाड आणि शिंदे उभे राहत नाही आणि हीच अवस्था संजय गायकवाड आणि रविकांत तूपकर यांची लोकसभा निवडणूकीच्या वेळी होती, परंतु आज, तिघेही एकमेकांना खेटून उभे होते आणि रेटून पंगत वाढत होते…
संत गजानन महाराज यांच्या प्रगट दिनानिमित्त येळगाव येथे विविध कार्यक्रम अयोजित करण्यात आले होते. आज 20 फेबु्रवारी रोजी महाप्रसादाने प्रगटदिनाच्या कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून ओळखले जाणारे आ.संजय गायकवाड, माजी आमदार विजयराज शिंदे, शेतकरी नेते रविकांत तुपकर हे महाप्रसादाचे वाटप करतांना एकत्र दिसून आले. यामध्ये विशेष की, आ.गायकवाड यांच्या बाजूला विजयराज शिंदे उपस्थित होते. गायकवाड यांनी हातात घेतलेल्या पोळी वर शिंदे यांनी भाजी टाकली तर रविकांत तुपकर यांनी पोळी-भाजीच्या बाजूला बुंदी टाकली. तूपकर यांनी विधानसभा निवडणूकीत कुणाकुणाच्या ताटात बुंदी टाकली, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. कारण ते ‘तटस्थ’ होते.
नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत व त्यानंतर आ.गायकवाड यांनी विजयराज शिंदे यांच्यावर जहरी टिका केली होती. माजी आमदार विजयराज शिंदे यांनी महाविकास आघाडीचे काम करून विरोधी उमेदवाराकडून 5 कोटी घेऊन त्यांनी दीड कोटीची गाडी घेतल्याचा आरोप गायकवाड यांनी केलेला आहे.
लोसकसभा निवडणूकीदरम्यान आ.गायकवाड आणि शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यातला वाद हा विकोपाला गेला होता. वैयक्तिक स्वरूपाचे आरोप प्रत्यारोप झाल्याचे दिसून आले होेते. आ.गायकवाड आणि शेतकरी नेते रविकांत तुपकर हे दत्तपूर येथे एका भुमिपूजन कार्यक्रमासाठी एकत्र आले होते. आ.गायकवाड यांना तुपकर सर्मथकांची मदत मिळाल्याची राजकीय चर्चा आहे. आज गजानन महाराज प्रगट दिनी हे तिन्ही नेते एकत्र आले होते.