शहर आणि युवा प्रमुखांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
बुलढाणा, 27 फेब्रुवारी (गुड इव्हिनिंग सिटी) : उबाठा शिवसेना गटामध्ये खळबळ उडवणारी घडामोड गुड इव्हिनिंग सिटीच्या हाबुलढाणाती लागली आहे. बुलढाणा शिवसेना उबाठा गटाच्या दोन्ही शहरप्रमुखांनी राजीनामा दिला आहे. यामध्ये शिवसेना शहरप्रमुख तथा माजी उपनगराध्यक्ष हेमंत खेडेकर आणि युवा सेनेचे शहरप्रमुख सचिन परांडे यांनी काल दिनांक 26 फेबु्रवारी रोजी राजीनामा दिला आहे.
त्यांनी संपर्कप्रमुख प्रा.नरेंद्र खेडेकर यांना दिलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे की, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या प्रेरणेतून शिवसैनिक ते विविध पदाच्या माध्यमातून संघटनेच्या बांधणीच्या अनुषंगाने गेली अनेक वर्षे काम करीत आहे.
सन 2024 ची लोकसभा, विधानसभा आपण ताकदीनिशी लढवत मिळेल त्या जबाबदारीला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. सद्यःस्थितीत मतदार संघामध्ये संघटनेअंतर्गत घडणार्या घडामोडी पाहता संघटनात्मक बांधणीच्या अनुषंगाने पदाचा राजीनामा देत आह असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
या दोघांनी बुलढाणा शहरात लोकसभा निवडणूकीच्या कालावधीत प्रा.नरेंद्र खेडेकर आणि बुलढाणा विधानसभा मतदारसंघाच्या वेळी जयश्रीताई शेळके यांचा जोरदार प्रचार करून त्यांनी बुलढाणा शहरातून मताधिक्य मिळून दिले होते.
हेंमत खेडेकर हे बुलढाणा नगर पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष आहे. जिजामाता नगर परिसरात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. तर सचिन परांडे हे सोशल मिडीयाच्या माध्यमातून शिवसेना उबाठा गटाची प्रबळपणे बाजू मांडतांना दिसून येतात. या दोघांच्या राजीनाम्यामुळे शिवसेना उबाठा गटाला ऐन नगर पालिकेच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर हा मोठा धक्का मानला जात आहे.