बुलढाणा, 10 एप्रिल (गुड इव्हिनिंग सिटी) ः हुंड्यासाठी छळछळ केल्यानेच नवविवाहीतेने आत्महत्या केल्याचे सिद्ध होवून तिचा पति सिद्धार्थ नामदेव खंडेराव आणि सासु रमाबाईला खामगांव न्यायालयाने सश्रम कारावासासह दंडाची शिक्षा ठोठावली आहे. यातील तिसरा आरोपी सासरा नामदेव खंडेराव प्रकरण सुरु असतांनाच मरण पावले होते. सदर न्यायनिर्णयामध्ये अतिरीक्त शासकीय अभियोक्ता अॅड.उदय सुधाकर आपटे यांनी सरकारी बाजू मांडून जोरदार युक्तीवाद केला आहे.
किन्हीमहादेव येथील देवेंद्र मारूती रनित यांची कन्या अनिता उर्फ रूपालीचा विवाह कवठळ येथील सिद्धार्थ खंडेराव याच्यासोबत 19 एप्रिल 2015 रोजी झाला होता. पण लग्नानंतर खंडेराव कुटूंबाने टाटा मॅजिक गाडी घेण्यासाठी 50 हजार रुपये हुंडयाची मागणी सुरु केली. यासाठी रूपालीचा सतत छळ होत होता. रूपालीच्या माहेरकडच्यांनी 20 हजार रुपये उसणवारीकरून खंडेराव कुटूंबाला दिले. पण उर्वरीत रकमेसाठी रूपालीचा पति सिद्धार्थ, सासु रमाबाई आणि सासरा नामदेव तिघेही रूपालीला छळत होते. या त्रासाला कंटाळून रूपालीने शेवटी 28 ऑक्टोबर 2015 रोजी विषारी औषध प्राशन करून घरी आत्महत्या केली. लग्न झाल्यापासून सहा महिने आपल्या मुलीचा, रूपालीचा सतत मानसिक आणि शारिरीक छळ होत असल्याचे देवेंद्र रनित यांना माहित होते. त्यामुळे त्यांनी संबंधित तामगांव पोलिस स्टेशनला त्याच दिवशी खंडेराव कुटूंबियांच्याविरोधात हुंड्यासाठी छळ करून मुलीच्या आत्महत्येला जबाबदार असल्याची फिर्याद दिली. यावरून तामगांव पोलिस स्टेशनमध्ये कलम 498अ, 304ब,34 नुसार एकुण तीन आरोपींविरूध्द गुन्हा नोंदविला होता. सदर गुन्हयावरून सत्र खटला खामगांव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश येथे न्यायप्रविष्ट होता. सदर प्रकरणातील एकूण 11 साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली तसेच मयत सौ. अनिता उर्फ रूपाली हिने कोणते विषारी औषध प्राशन केले, त्या बाबतचा न्यायवैद्यकीय रिपोर्ट दाखल करण्यात आला होता व त्यामध्ये झिंक फोस्फाईड याचा उल्लेख आलेला आहे. मृत्युपूर्वी मयताचा हुंडा मागणीवरून छळ करण्यात आला हे देखील साक्षीदारांच्या जबाबात सिध्द झालेे. सदर प्रकरणाची सुनावणी खामगाव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश द्वितीय पी.पी. कुलकर्णी यांच्यासमोर करण्यात आली. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे 11 साक्षिदाराची साक्ष नोंदविण्यात आली त्यात सदर प्रकरणातील फिर्यादी देवेंद्र रनित, सिध्दार्थ इंगळे, सुनिता मेळे, ज्ञानदेव रनित, गजानन चव्हाण, विनोद रनित, प्रमोद रनित, गजानन रणित यांची साथ तसेच डॉ. प्रेमचंद पंडित, पुंडलिक शिवराम तांबारे, तपास अधिकारी कपिल पुंजाराम शेळके एपीआय तामगांव पोलिस स्टेशन यांची साक्ष देखिल अत्यंत महत्वाची ठरली. एकूण 11 साक्षीदारांचा साक्ष पुरावा अतिरिक्त शासकिय अभियोक्ता अॅड.उदय आपटे यांनी नोंदविला. हुंड्यासाठी रूपालीचा छळ झाल्याचे सिद्ध झाले.
सदर प्रकरणात सरकारपक्षाने, आरोपी यांचे विरूध्दचा आरोप वि. न्यायालयासमोर सिध्द केल्याने वि. न्यायाधीश पी. पी. कुलकर्णी यांनी अतिरिक्त शासकिय अभियोक्ता अॅड.उदय आपटे यांचा युक्तीवाद ग्राह्य मानून तसेच भा.दं.वि व भारतीय पुरावा कायदयातील गृहीततत्वे मान्य करून यामध्ये आज 10 एप्रिल रोजी खामगांव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश 2 पी. पी. कुलकर्णी यांनी आरोपी सिध्दार्थ नामदेव खंडेराव, वय 27, रमाबाई नामदेव खंडेराव, वय 65, रा. कवठळ यांना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सदर प्रकरणातील आरोपी नामदेव तानाजी खंडेराव यांचे सत्र खटला चालू असतांना निधन झाले आहे. आरोपीविरूध्द भा.दं.वि. चे कलम, 498अ 304ब, 306,34 नुसार दोषारोप सिध्द होत असल्याचा न्यायनिर्णय देण्यात आला आहे. त्याप्रमाणे आरोपीस शिक्षा 498 अ नुसार 3 वर्षे सश्रम कारावास व 10 हजार प्रत्येकी दंड न भरल्यास 4 महिन्याची शिक्षा तसेच 304 व नुसार 7 वर्षे सश्रम कारावास तसेच 306 नुसार 7 वर्षे सश्रम कारावास व 1 हजार रूपये दंड न भरल्यास 4 महिन्याची शिक्षा असा न्यायनिर्णय दिला आहे.
सरकार पक्षातर्फे अतिरीक्त शासकीय अभियोक्ता तथा स्पेशल एपीपी अॅड.उदय सुधाकर आपटे यांनी कामकाज पाहिले. सदर प्रकरणाचा तपास तपास अधिकारी एपीआय कपिल पुंजाराम शेळके, तामगांव पोलिस स्टेशन यांनी केला होता. कोर्ट पैरवी म्हणून अमर कस्तुरे यांनी सहकार्य केले.