सतत कानात घोंघावणारा सायरनचा आवाज, विमानांनी आकाशाच्या दिशेने केलेले उड्डाण त्यांचा झेपावण्याचा आवाज, मधातच बॉम्बचे आवाज उडविण्यात आलेली घरे आणि घशाला कोरड येईस्तोवर ओरडणारा वृत्त निवेदक. असं काहीसं चित्र कमीअधिक सर्वच वृत्तवाहिन्यांवर दाखवलं जात आहे. ते सत्य आहे की नाही याची कोणतीही शाश्वती नसतांना लोकांना अधिक चिंतातुन करण्याचं काम आज सुरु आहे. ब्रेकींग सर्वात आधी कुणाची यासाठी जी स्पर्धा सुरु आहे त्यात कुठेही जबाबदार पत्रकारिता आढळुन येत नाही. हे दुर्दैवाने कबुल करावे लागेल. पाकीस्तानातील दहशतवाद्यांनी पहलगाम मध्ये सर्वसामान्य पर्यटकांना लक्ष्य केल्यानंतर भारत- पाकिस्तान मध्ये जे सुरु आहे त्याचं लाईव्ह चित्रण दाखविण्याची जणु चढाओढ लागलेली आहे. पाकीस्तानने कुठे कुठे हल्ले केले, कोणते मिसाईल होते, कोणत्या बनावटीचे होते एवढेच नव्हे तर त्यावर मेड ईन चायना आहे का तुर्की हे देखील लष्कराने अधिकृतरित्या जाहिर करण्याआधी आपल्या भारतातील मिडीया ते दाखवुन मोकळी देखील होत आहे. त्यांची ही कृती खरोखरंच देशहिताला पुरक आहे का? याचं आत्मचिंतन करण्याची वेळ आज आली आहे. हे झालं मिडीया न्युज चॅनेलवाल्यांसंदर्भात. भारतातील सोशल मिडीया ही यापेक्षा वेगळं काही करत नाहीये. सिमेवर सैन्य आपल्या प्रयत्नांची शर्थ करत असतांना अंतर्गत परिस्थिती सुधारण्याची जबाबदारी भारतीय नागरिक म्हणुन आपल्यावर येऊन पडते याचं भान न ठेवता. सैनिकांनी भरलेली ट्रेन जम्मुसाठी रवाना तसेच आई- बायको -बहीणींना गळयात घेवुन रडतांना दाखवुन व त्यावर ‘ऐ जाते हुए लम्हो’ असं छानसं गीत तयार करुन सोशल मिडीयावर स्टेटस लावण्यात जी धन्यता मिळत आहे ती स्तुतीच्या लायक आहे का? वातावरण गंभीर असतांना आपण ते आणखी गंभीर करण्यात आपण हातभार लावत आहोत यांच साधं भानही लोकांना असु नये याची खंत वाटते. बरं महागाई, बेरोजगारी यावर चुप्पी साधणारे भक्तांना एकदम रोजगार मिळाल्यासारखी परिस्थीती निर्माण झाली आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांनी मिडीयासमोर येवुन संपुर्ण देश केंद्र सरकारच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली तरी काँग्रेस कशी वाईट होती. अन मोदीजी किती भारी आहेत हे तुलनात्मरित्या प्रस्तुत करुन भारताची अखंडता का विखंडता? दाखविण्याचं काम ते करत आहेत. एखाद्या अल्पसंख्याक समुदायाने अथवा संघटनेने भारताला पाठींबा जाहिर केला. तर बोलण्याइतपत आपल्याला राजकीय जाण आहे का याचाही थोडासा अभ्यास केला पाहिजे. देशप्रेमाचा ठेका फक्त् भक्तांकडे नसुन, देश हा सर्वसामान्य नागरिकांनाही तितकाच प्रिय आहे. अशा आणिबाणीच्या प्रसंगी देश एकसंघ कसा राहील या दृष्टीने प्रत्येक भारतीयाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. धर्म विचारुन त्यांनी गोळया घातल्या म्हणुन त्यांचे धर्माचा त्या धर्मातील व्यक्तींचा तिरस्कार जर आपण करत असु तर आपल्यात आणि त्यांच्यात फरक तो काय? “ऑपरेशन सिंदुर” हा बदला आहे हे मान्य, पण हे राबविणारे कोणाच्या तरी कपाळाचे सिंदुर आहेत आणि ते देशासाठी लढण्यास सज्ज आहेत. त्यांना धर्माच्या चौकटीत बांधण्याचा तुम्हा आम्हाला अधिकार नाही. काल-परवा सोशल मिडीयावर लष्कराच्या ऑन डयुटी 27 वर्षाची महिला अफसर शहिद झाल्याची व त्यावर श्रध्दांजलीची बातमी सर्वदुर फिरत आहे. वास्तविक त्या महिला अधिकारी 2015 मध्ये शहिद झालेल्या असतांना भारत- पाकीस्तानचा संदर्भाने ती बातमी आज प्रसिध्द करुन वातावरण आणखी गंभीर करण्याचा प्रकार का केल्या जात आहे, याचा शोध घेणे आवश्यक आहे. मुळात सैन्याच्या बाबतीत मिडीया असेल वा सोशल मिडीया यांनी बातम्या प्रसारित करु नये अशा सुचना देण्यात आलेल्या आहेत. तरीही ब्रेकींगच्या नावाखाली आपण शत्रुंना अजाणतेपणी नव्हे तर जाणुनबुजुन आपल्या प्रत्येक हालचालींची माहिती तर पुरवित नाही ना याची जाणीव ठेवावी लागेल. पाकिस्तानचे इतके लोक मेले, भारताचे इतके शहिद झाले असं दाखवतांना, तुमच्यासाठी जरी ती निव्वळ संख्या असली तरी ज्यांच्या परिवारातील लोकं तेथे देशसेवा करत आहेत त्यांचे मनावर काय परिणाम होत असतील याचाही गंभीरतेने विचार आपल्या ब्रेकींग न्युज चॅनेलवाल्यांनी विचार करावा. कसाब आणि त्याच्या साथीदारांना सुरक्षा यंत्रणांची प्रत्येक हालचालींची बातमी हॉटेलच्या टिव्हीवरुन कळाली असल्याचे मागे वाचनात आलं होतं. आजही तशीच परिस्थिती निर्माण झालेली असतांना आपण जबाबदार व्हायचे कधी? युध्द ही मनाविरुध्द करावी लागणारी कृती आहे, तो उत्सव म्हणुन साजरा करु नका एवढीच अपेक्षा या निमीत्ताने..