◾ 18 जूनला गर्दे हॉल मध्ये रंगणार काव्य मैफिल
बुलढाणा, 16 जून (गुड इव्हिनिंग सिटी) : महाराष्ट्रातील असं कुठलंही गांव किंवा शहर नाही, ज्या ठिकाणचा युवकवर्ग कवी अनंत राऊत यांना ओळखत नाही. त्यांचे “मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…” हे गीत अनेकांच्या ओठांवर आहे. तेच अनंत राऊत बुधवार, 18 जून रोजी बुलढाण्यात काव्य मैफिल सजविणार आहेत. असंख्य विद्यार्थ्यांच्या ज्ञानरूपी पंखांमध्ये ज्ञानरूपी गरूडझेपीचे बळ देणारे भाजपचे जिल्हा शिक्षक आघाडीचे अध्यक्ष विद्यार्थी प्रिय प्रा.भगवान गरूडे सरांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाण्यात बहारदार काव्य मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, दिनांक 18 जून रोजी सायंकाळी 6 वाजता ही मैफिल गर्दे वाचनालयाच्या सभागृहात आयोजित केले आहे. या बहारदार काव्य मैफिलीला प्रमुख उपस्थिती म्हणून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे, चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले, पश्चिम विभागीय शिक्षक संघटना भाजपच्या अध्यक्ष संगिताताई शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. काव्य मैफिलीचे निवेदन सुप्रसिद्ध गझलकार गोपाल मापारी तर सुत्रसंचलन जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजीतसिंग राजपूत हे करणार आहे. तरी बहारदार काव्य मैफिलीला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राजे छत्रपती कला महाविद्यालय धामणगाव बढे तथा समस्त सोबती ग्रुप बुलढाणा जिल्हा भाजप शिक्षक आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.