बुलढाण्यात शिक्षणसंस्थांकडून ड्रेस, वह्या-पुस्तकांची बेकायदेशीर विक्री
बुलढाणा, 29 जून (गुड इव्हिनिंग सिटी) : नवीन शैक्षणिक धोरणामुळे भारत महासत्ता होण्याचे स्वप्न बघणारा शिक्षण विभाग म्हणजे दिव्याखाली अंधार झाला आहे. शिक्षण शुल्काच्या नावाखाली अवाढव्य फी च्या धोरणावर काहीच काम होत नाही, तिथे ड्रेस, वह्या पुस्तके विकणार्या शिक्षण संस्थांवर अंकुश कसा बसेल ? दुकानदार झालेल्या शाळा आणि शिक्षण म्हणजे धंदा, असा प्रकार सर्वत्रच सुरु असून बुलढाण्यातील काही शाळांकडून बेकायदेशीरपणे ड्रेस, वह्या-पुस्तके विकण्याचा ‘व्यापार सर्रास सुरु आहे. यासंदर्भात मानव अधिकार संरक्षण समिती चे राज्य संघटक सचिव प्रफुल्ल कुळकणी यांनी मुख्यामंत्र्यांकडे याबाब तक्रार केली आहे.
सध्या शहरातील अनेक खासगी शिक्षण संस्थांनी प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. वर्ष संपण्यापूर्वीच पुढील वर्षाचे प्रवेश दिले. याचबरोबर शालेय साहित्य शाळेतूनच घ्यावे असा नियमच जणू या शाळांनी पालकांवर लादला आहे. बाजारभावापेक्षा जास्त दर आकारून शालेय साहित्य देण्याचा धंदा सध्या तेजीत आहे. साहित्य घेण्यासाठी सक्ती केली जात असल्याने पालक संतप्त झाले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील काही शाळांचा यामध्ये समावेश आहे. एका पालकाने गुड इव्हिनिंग सिटीला एका शाळेची पावती दिली आहे. त्यामध्ये पुस्तके, वह्या, ड्रेस सगळे मिळून 7 हजार 200 रूपयाची पावती दिली आहे. तर एका शाळेच्या पावतीमध्ये बाराशे रूपये वसूल केले. त्यामध्ये विविध बाबींचा समावेश आहे पण पैसे कशाचे घेतले हे नमूद नाही.
सोशल मिडीयावर सुध्दा एक मेसेज फिरतो तो म्हणजे आमच्या शाळेत तुम्हाला कपडे, बुट, पुस्तक मिळेल पण शिक्षण मात्र शिकवणी लावून मिळेल. तसाच प्रकार आता घडतांना दिसत आहे. म्हणजे शिक्षणाच्या महत्वापेक्षा तेथील थाटबाट महत्वाचा आहे.
वारंवार असे प्रकार घडत असूनही अशा शिक्षण संस्थांवर कारवाई का होत नाही असा सवाल आता उपस्थित होत आहे. शिक्षण क्षेत्रात वाढत असलेल्या स्पर्धेमुळे शैक्षणिक संस्था विविध योजना राबवीत असल्याचे वास्तव शहरात दिसत आहे. विद्यार्थी संख्या वाढावी, यासाठी अनेक खासगी संस्था जाहिरातबाजीत व्यस्त आहेत. मात्र शालेय साहित्य शाळेतूनच खरेदी करण्याची सक्ती प्रशासनाकडून केली जात असल्याने पालक संतप्त झाले आहेत. या बाबत शाळेचे धोरण ठरल्याचे सांगितले जात आहे. शालेय साहित्य कसे असावे व त्याचा दर्जा या बाबत शाळा प्रशासनाने निर्णय घेतला असल्याचे सांगत पालकांवर साहित्य खरेदीसाठी जबरदस्ती केली जात आहे. या बाबत तक्रार करूनही काही उपयोग होत नसल्याने पालक हवालदिल झाले आहेत. शालेय साहित्य पुरविणारी मंडळी व शाळा प्रशासन यांचे साटेलोटे असल्याने कमिशन मिळविण्यासाठी हा काळाबाजार सुरु असल्याच्या तक्रारी पालक करीत आहेत. याचबरोबर शाळेचा गणवेश कोणत्या दुकानातून घ्यावा, यासाठीही सक्ती केली आहे. शिक्षणाच्या नावाखाली पालकांना सक्ती करून पैसे उकळण्याचा धंदा सध्या तेजीत आहे.