spot_img

बंपर खुशखबर ! बुलढाणा नगर परिषदेकडून अभय योजनेची घोषणा

मालमत्ता करावरील दंडात 50 टक्के सूट

बुलढाणा, 30 जून (गुड इव्हिनिंग सिटी/रणजीतसिंग राजपूत) : प्रलंबित मालमत्ता कर वसूल होण्याच्या दृष्टिकोनातून बुलढाणा नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी अभय योजनेची घोषणा केली आहे. नगरपरिषद क्षेत्रातील थकीत मालमत्ता करा वरील शास्ती अर्थात पेनल्टी 50 टक्केपर्यंत माफ करून कर वसूल करण्यासाठी प्रोत्साहन मिळण्यासाठी अभय योजना सुरू करण्यात आली असून ही योजना थकबाकीदारांसाठी निश्चितच बंपर खुशखबर घेऊन आली आहे. अर्थात सदर योजना 31 जुलै 2025 पर्यंतच मर्यादित असून योजना एकदाच लागू असणार आहे. सदर योजनेचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेण्याचे आवाहन मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी केले आहे.

राज्यातील नगरपालिका/नगरपरिषदा/नगरपंचायत क्षेत्रामध्ये अनेक वेळा मालमत्ता कराची थकबाकीची रक्कम जास्त असणे, मालमत्ताधारकांची आर्थिक अडचण असणे या व इतर कारणांमुळे मालमत्ता कराचा भरणा करण्यात येत नाही. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1966 चे कलम 150 (अ) (1) नुसार बिलाच्या न भरलेल्या रकमेवर संबंधित नगरपरिषद/नगरपंचायत यांचेकडून दरमहा 2% शास्ती लावण्याचे प्रावधान आहे. यामुळे मालमत्ताधारकाच्या एकूण थकबाकीमध्ये वाढ होऊन याचा विपरीत परिणाम करवसुलीवर होतो. यावर उपाययोजना म्हणून नगरपरिषदा क्षेत्रातील थकीत मालमत्ता करावरील शास्ती माफ करून कर वसूल करण्यासाठी प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टीने अभय योजना लागू करण्याबाबत शासनस्तरावर विचार करण्यात आला आहे.

नगरपालिका/नगरपरिषद व नगरपंचायती क्षेत्रातील मिळकत धारकांकरिता दि. 19 मे 2025 रोजी महाराष्ट्र शासनाने मालमत्ता करावरील शास्ती माफ करणेकामी अभय योजना प्रोत्साहनात्मक राबविण्याचा निर्णय घेतला आहे. सदर योजनेमध्ये दि. 19 मे 2025 रोजी ज्या थकीत मिळकतधारकांची शास्ती थकबाकी आहे, अशा मिळकतधारकास महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती अधिनियम 1966 चे कलम 150 (अ) नुसार नगरपरिषद मालमत्ता करावरील शास्ती अंशतः / पूर्णतः माफ करण्यासाठी मिळकतकराची पूर्ण रक्कम भरून विहीत नमुन्यात अर्ज सादर करू शकतील.

जे मिळकतधारक अभय योजनेचा लाभ घेवू इच्छितात अशांकडून विहीत नमुन्यात, प्रकरणपरत्वे 50 टक्के पर्यंत किंवा त्याहून जास्त सवलत मागणी करता परिपूर्ण प्रस्ताव नगरपरिषदेकडे सादर करावा लागेल. विहीत नुमना नगरपरिषदेच्या कार्यालयात उपलब्ध असून त्या नमुन्यात अर्ज सादर करावा. दि.19 मे 2025 नंतरच्या थकबाकी शास्तीस अभय योजना लागू राहणार नाही, हे महत्वाचे. प्रस्ताव सादर करताना आधारकार्ड छायाप्रत, मालमत्ता कराच्या मागणी बिलाची छायाप्रत्त व संपूर्ण कराची रक्कम भरलेल्या पावतीची छायाप्रत जोडणे आवश्यक आहे.त

सेच सन 2025-26 ची मालमत्ता कर व इतर करांची बिले तयार होवून बिले वाटपाचे काम सुरू केलेले आहे. तसेच ज्यांना अद्याप बिले मिळाली नसतील त्या मिळकतधारकांनी नगरपरिषद बुलढाणा येथे भेट देऊन बिले प्राप्त करून घ्यावे व सदर बिलाचा भरणा करून भरणा पावती अर्जासोबत सादर करावी. तरी थकीत शास्ती वगळता कराची इतर रक्कम तात्काळ भरून शास्ती माफी अभय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी श्री पांडे यांनी गुड इव्हिनिंग सिटीच्या माध्यमातून केले आहे. अभय योजनेच्या अधिक माहितीसाठी नगर परिषदेचे कर अधीक्षक उमेश काकड मो. नं.  77098 79770 वर संपर्क करावा असेही नगर परिषदेने कळवले आहे.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत