राष्ट्रवादी म्हणते, “तर सिग्नल हटवू”
बुलढाणा, 8 जुलै (गुड इव्हिनिंग सिटी) ः लाखो रूपये खर्च करून बुलडाणा शहरातील रहदारीच्या चौकात ट्रॉफीक सिग्नल बसविण्यात आले. तथापी वाहनधारक या सिग्नलचा वापर न करता सर्रास सिग्नल तोडून नियमाचे उलंघन करीत आहेत. हा प्रकार चौकात डिट्युवर असलेले ट्रॉफिक पोलिस उघड्या डोळयाने पाहात असताना कोणतीही कारवाई करीत नाहीत. जर या सिग्नलचा वापर होत नसेल तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सिग्नल तोडो आंदोलन करेल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष मंगेश बिडवे यांनी प्रशासनाला दिला आहे. त्यांनी जिल्हधिकारी व संबंधीत पोलिस प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
बुलडाणा शहरात मागील तीन महिन्यापासून लाखो रुपये खर्च करुन रहदारी असलेल्या चौकात सिग्नल बसविण्यात आले आहेत. ते सिग्नल कार्यन्वीत सुद्धा झाले आहेत. तथापी एकाही चौकात या सिग्नलचे पालन होत नसल्याचे दिसत आहे. सिग्नल सुरु असताना एकही वाहनधारक सिग्नल नुसार आपली वाहने चालवत नाही. हा प्रकार तेथे डूयटीवर असलेले वाहतुक पोलीस उघड्या डोळ्याने बघत असतात. परंतु ते कोणत्याही वाहनाला अटकाव करीत नाहीत केवळ जिल्हाधिकारी, व जिल्हा पोलिस अधिक्षक ज्या चौकातून जातात त्याच वेळेस हे पोलीस वाहतूक सुरळीत करतांना दिसतात. त्यामूळे हे सिग्नल केवळ व्हीआयपी वाहनासाठीच आहेत काय? असा प्रश्न पडतो. सध्या शाळा कॉलेजेस सुरु झाले आहेत. सकाळ संध्याकाळ रस्त्यावर विद्यार्थ्यांची गर्दी असते अशा वेळी सिग्नलचे नियम पाळणे आवश्यक आहेत.
वास्तविक बुलडाणा शहरातील वाहन धारकासाठी सिग्नल हे नविन आहेत. त्यांना सिग्नलचे नियम पाळा हे सांगायाची जबाबदारी ही वाहतुक पोलीसांची आहे. तथापी चौकात उभे असलेल्या पोलीसा समोर नागरीक सिग्नलचे नियम तोडतात व वाहतुक पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेत असतील तर हे सिग्नल लावून शासनाच्या पैशाचा अपव्यय कशासाठी असा प्रश्न पडतो. यापूर्वी सुध्दा शहरात सिग्नल लावून लाखो रुपये केवळ कंत्राटदाराच्या घशात घातले होते. तेव्हा सुद्धा सिग्नलचा वापर झाला नाही. पून्हा जर कंत्राटदाराला मलई चारण्यासाठी सिग्नल लावण्यात आले असतील तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बुलडाणा शहरातील सिग्नल हटाव आंदोलन करण्यात येईल असा ईशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आह. या निवेदनावर शहर अध्यक्ष मंगेश बिडवे,सत्तार कुरेशी, महेश देवरे, मनिष बोरकर, सुजित देशमुख, दिपक गायकवाड, अनिल बावस्कर यांच्या सह्या आहेत.