बुलढाणा, 9 जुलै (गुड इव्हिनिंग सिटी) : शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण मिळाल्याने कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या घटनेमुळे राजकीय वातावरण तापले आहे. विधान परिषदेत यावर चर्चा होताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गायकवाड यांच्या कृतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत सभागृहाच्या अध्यक्षांना कारवाईचा निर्णय घेण्याची विनंती केली. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही गायकवाड यांना समज दिल्याचे सांगितले आहे.
शिंदे म्हणाले, निकृष्ट जेवणामुळे कोणालाही त्रास होऊ शकतो. गायकवाड यांना खराब जेवणामुळे उलटी झाली आणि रागाच्या भरात त्यांनी कर्मचाऱ्याला मारहाण केली. पण आमदार हे लोकप्रतिनिधी असतात. त्यांना कायदेशीर मार्गाने कारवाई करण्याचा अधिकार आहे. अशा प्रकारे मारहाण करणे अयोग्य आहे. मी स्वतः गायकवाड यांना याबाबत समज दिली आहे.
दरम्यान, पुढे बोलताना शिंदे यांनी विरोधकांवरही टीका केली. ते म्हणाले, विरोधक रोज विविध मुद्द्यांवर बोलतात. आम्ही त्यांना सभागृहात बोलण्याची संधी देतो आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास तयार असतो. पण त्यांना सभागृहाबाहेर बोलण्यातच जास्त रस आहे. कोणत्याही पक्षाचा लोकप्रतिनिधी असो, त्याने आपली जबाबदारी समजून आणि कर्तव्याचे भान ठेवून वागले पाहिजे.
मी त्याची माहिती घेतली आणि तो व्हिडीओ मी स्वतः बघितला आहे. अशा प्रकारचे वर्तन आपल्या कुणासाठीही भूषणावह नाही. याच्याने विधिमंडळाची आणि आपल्या सगळ्यांची आणि आमदारांची प्रतिष्ठा, प्रतिमा कमी होते. माहिती अशी आली की आमदार निवासातील व्यवस्था नीट नव्हती. भाजी वास मारत होती. या सगळ्या गोष्टीची तक्रार करता येते. त्याच्यावर कारवाई करता येते. अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधीने मारहाण करणे आणि त्याचे व्हिडीओ येणे. टॉवेलवर येऊन मारलं किंवा कसेही मारले तरी ते चुकीचेच आहे. योग्य नाहीये. यातून सगळ्या आमदारांबद्दल लोकांमध्ये चुकीची भावना जाते.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री