बुलढाणा, 10 जुलै (गुड इव्हिनिंग सिटी) : आमदार निवासातील राड्यामुळे काल आमदार संजय गायकवाड हे नॅशनल मिडीयाचे हेडलाईनवर होते. आज पुढारी वृत्तपत्रात लातुर जिल्ह्यातील शेतकर्याला दिलेल्या बैलजोडीतला एक बैल मारका असल्याची बातमी आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी हाडोळती येथील शेतकरी अंबादास पवार यांना दिलेल्या बैल जोडीतील एक बैल सध्या लातूर जिल्ह्यात भलताच चर्चेत आहे. हा बैल त्या शेतकर्याला जवळ येवू देत नाही त्याच्याकडे जायचा प्रयत्न केला तर तो पाय मागे घेतो, नंतर तो मारतो की काय अशी धास्ती त्याच्याकडे पाहिल्यानंतर वाटते.
हाडोळती येथील शेतकरी अंबादास पवार व त्याच्या पत्नीची औत ओढत असतानाची समाजमाध्यमावर व्हायरल झालेली चित्रफित पाहून गायकवाड साहेबांना गलबलून आले होते व त्यांनी त्यांच्या वतीने त्या शेतकर्यास मोफत बैलजोडी देण्याचे जाहीर केले होते. हाडोळती येथे अगदी बांधावर जाऊन त्यांनी ही बैलजोडी अंबादास पवारांच्या स्वाधीन केली होती. तथापि त्यांनी दिलेल्या बैल जोडीतील एक बैल मात्र त्या शेतकर्यास त्याच्याजवळ येवू देत नाही. प्रयत्न केला तर पाय खोरतो त्याचा तो पवित्रा पाहून तो मारका आहे असा तर्क शेतकर्यांनी अन गावकर्यांनी केला आहे. या धास्तीने त्याच्या वाटेला जायचे नाही असेही त्यांनी ठरवले आहे. दरम्यान मुंबई येथे गायकवाड त्यानी उपहारगृहातील एका कर्मचार्याला रागात ठोसे मारले असल्याची बातमी सध्या ताजी आहे. त्यावरून लातूर जिल्ह्यात मार्मीक चर्चा सुरू आहे. दरम्यान अभिनेता सोनू सुदला पवार यांना बैलजोडी मिळाल्याचे माध्यमातून समजले. त्यानंतर त्यांनी टिव्ट करीत पवार यांना त्यांच्या बैंक खात्यावर 45 हजार रुपये जमा केल्याचे स्थानिकांनी सांगितले. बरे झाले सोनुने बैलजोडी पाठवली नाही अशीही मिश्कील चर्चा मारक्या बैलावरुन पुन्हा रंगली आहे.
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सुध्दा त्या शेतकर्याला बैलजोडी दिली आहे. ती बैलजोडी कशी आहे त्याबाबत माहिती मिळू शकली नाही.