बुलढाणा, 10 जुलै (गुड इव्हिनिंग सिटी) ः नगर परिषदांच्या निवडणूका जवळ आल्या आहेत आणि त्याअनुषंगाने सगळीकडेच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बुलढाण्यातील मोठे राजकीय नेते मो. सज्जाद यांनी काल, मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे. उपमुख्यमंत्री तथा पक्षाध्यक्ष अजीतदादा पवार यांच्या हस्ते हा प्रवेश सोहळा मुंबईत पार पडला. यापूर्वी मो. सज्जाद यांना वंचितचे नेते म्हणून ओळखत असले तरी 2019 मध्ये एमआयएमकडून विधानसभा लढविली होती. अर्थात वंचितमध्ये जाण्यापूर्वी ते राष्ट्रवादीचे नगरसेवक म्हणून निवडून आलेले होते. बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील, आमदार मनोज कायंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी तथा माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. 2011 मध्ये मो. सज्जाद यांनी आपल्यासह काही नगरसेवक निवडून आणले होते. त्यावेळी ते राष्ट्रवादीत होते. 2014 मध्ये नगराध्यक्षपदासाठी ते इच्छूक होते. तेव्हा नगरसेवकांमधून नगराध्यक्ष निवडल्या जात होते. परंतु त्यंाचा दावा असतांनाही आणि तयारी पूर्ण असतांनाही टी.डी. अंभोरे यांचे नांव पुढे आले. मो. सज्जाद विरूद्ध टी.डी. अंभोरे अशी निवडणूक होणार होती. परंतु पुरेसे संख्याबळ नसल्याचे लक्षात आल्यानंतर मो. सज्जाद यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. त्यावेळी टी.डी. अंभोरे नगराध्यक्ष झाले होते. त्यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर 2016 मध्ये जनतेतून नगराध्यक्ष पदाच्या निवडणूका लागल्या होत्या. मो. सज्जाद यांनी राष्ट्रवादी सोडून पत्नीसह वंचित बहुजन आघाडीत ऐनवेळी प्रवेश घेतला होता. त्यांच्या पत्नी नजमुन्नीसा मो. सज्जाद नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीत विजयी झाल्या. त्यांनी सौ. पूजाताई संजय गायकवाड यांचा पराभव केला होता. कार्यकाळ संपल्यानंतर मो. सज्जाद वंचितमध्ये पाहीजे तेव्हढे सक्रिय राहीले नाहीत. उलट 2019 मध्ये त्यांनी एमआयएमपक्षाकडून विधानसभा निवडणूक लढविली होती. त्यांना केवळ 3792 मते मिळाली होती. आता मात्र त्यांनी पुन्हा घरवापसी केली आहे. राष्ट्रवादीत प्रवेश करीत नगराध्यक्ष पदासाठीची निवडणूक लढण्याची त्यांची योजना असावी. त्यांच्या या प्रवेशामुळे बुलढाणा नगर पालिकेचे राजकारण नक्कीच तापणार हे मात्र नक्की.