कॅबिनवाले नव्हे तर रस्त्यावर उतरून काम करणारे एसपी
बुलढाणा, 19 ऑगस्ट (गुड इव्हिनिंग सिटी) ः पुरावरून पाणी जात असल्यामुळे स्कूल बस अडकून पडलेल्या शाळकरी मुलांच्या मदतीला जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे धावून आले. गेल्या दोन दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर आहे. 17 व 18 ऑगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पुर आला होता. तर चिखली शहर हे जलमय झाले होते. यामुळे सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले. बुलढाणा चिखली मार्गावर हातनी येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने रस्ता बंद होता. यामध्ये 5 स्कूल बसेस लहान मुलांसह अडकून पडल्या होत्या ही गोष्ट पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांना कळाताच त्यांनी तात्कळ मुलांकडे धाव घेतली. हातनी येथे प्रत्यक्ष भेट देऊन व शिक्षकांशी संवाद साधून स्कूल बसेस पोलीस एस्कॉर्टसह उंद्री मार्गे चिखलीकडे सुखरूप पणे पाठविल्या. जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर ते लगेच त्याठिकाणी दाखल होऊन वाहतूक सुरळीत केल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. कारण काही एसपी हे कॅबीनमध्येच बसून काम करतात तर काही रस्त्यावर उतरून काम करतात. जे लोकांमध्ये राहून काम करतात तेच लोकाभिमुख अधिकारी म्हणून परिचीत होतात.