खून करून मृतदेह फेकला होता नदीत
बुलडाणा, 19 ऑगस्ट (गुड इव्हिनिंग सिटी) : विवाहित प्रियकराचा मामेभाऊ व मित्राच्या मदतीने खून करून मृतदेह प्लास्टिक ताडपत्रीत गुंडाळून गोदापात्रात फेकल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आल्याने खळबळ उडाली होती. खून करणाऱ्या प्रेयसी व तिच्या साथीदाराला साखरखेर्डा येथून अटक करण्यात आली आहे. मृतक तरुणाच्या भावाने याप्रकरणात पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी रविवारी (१७ ऑगस्ट) प्रेयसीविरुद्ध गुन्हा दाखल केला. अहिल्यानगर गुन्हे शाखेने या खुनाचा झटपट तपास करत प्रेयसी भारती रवींद्र दुबे (वय ३४, रा. कॅनॉट प्लेस, सिडको) आणि तिचा कथित मामेभाऊ साथीदार दुर्गेश मदन तिवारी (वय २४, रा. वडोद कान्होबा, ता. खुलताबाद) आणि अफरोज खान (रा. कटकट गेट, छत्रपती संभाजीनगर) यांना अटक केली आहे.
सचिन पुंडलिक औताडे (वय ३२, रा. कोलठाणवाडी रोड, शिवनेरी कॉलनी, हर्सुल) असे हत्या झालेल्या प्रियकराचे नाव आहे, तर राहुल पुंडलिक औताडे (वय ३५, रा. कोलठाणवाडी रोड, शिवनेरी कॉलनी, हसूल, छत्रपती संभाजीनगर) यांनी या प्रकरणात अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मृतक सचिन हा पत्नी भक्ती, ३ वर्षीय मुलगी, १ वर्षाचा मुलगा, भाऊ राहुल, वहिणी जिजाबाई, वडील पुंडलिक, आई जनाबाई यांच्यासह राहत होता. हे कुटुंब शेती करून उदरनिर्वाह करते. ३१ जुलैला दुपारी साडेबाराच्या सुमारास सचिन राहत्या घरातून कोणाला काही एक न सांगता मोटारसायकलीवरून (एमएच २० एएफ ५६५१) निघून गेला होता.
कुटुंबीयांनी त्याचा सगळीकडे शोध घेतला. मात्र तो मिळून आला नव्हता. त्यामुळे तो हरवल्याची तक्रार वडील पुंडलिक हरिभाऊ औताडे (वय ६९) यांनी हर्सल पोलीस ठाण्यात ४ ऑगस्टला केली होती. बुधवारी (१३ ऑगस्ट) शेवगाव पोलिसांनी राहुल औताडे यांना कॉल करून कळवले, की मुंगी (ता. शेवगाव जि. अहिल्यानगर) गावच्या हद्दीत सदाशिवराजे भोसले यांच्या शेतजमिनीच्या कडेला असलेल्या गोदावरी नदीचे पात्रात सचिनचा मृतदेह आढळला आहे. औताडे कुटुंबीय पोहोचेपर्यंत मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून बेवारस म्हणून दफनविधीही करण्यात आला होता.
४ वर्षांपासून विवाहबाह्य संबंध…
सचिन याचे भारती रवींद्र दुबे (रा. कॅनॉट प्लेस, सिडको, छत्रपती संभाजीनगर) हिच्यासोबत चार वर्षांपासून विवाहबाह्य प्रेमसंबंध होते. भारती दुबे हिचे इतर पुरुषांसोबत देखील संबंध असल्याने त्या दोघांत नेहमी वाद होत असायचे. सचिन घरातून निघून गेल्यानंतर शोध घेत असताना राहुल औताडे हे चौकशी करत असताना त्यांना भारती व सचिनचा मित्र प्रशांत रमेश महाजन (रा. सिडको) याने सांगितले होते, की ३१ जुलैला दुपारनंतर सचिन व भारती हे लग्न समारंभासाठी भारतीच्या गाडीमधून जालना येथे गेले.
पुन्हा सायंकाळी सातला भारतीच्या राहत्या घरी आले होते. तिच्या घरात रात्री दोघेही दारू पिले. सचिन तेथेच थांबला होता. त्यामुळे यांनी तक्रारीत भारतीवर दाट संशय व्यक्त केला होता. सचिन व भारती यांच्यात वाद होऊन भारतीने तिच्या साथीदारांच्या मदतीने सचिनचा घातपात करून जीवे मारून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह गोदावरी नदीपात्रात फेकून दिला असावा, असे त्यांनी तक्रारीत म्हटले होते.
असा केला खून…
भारती पतीपासून विभक्त एकटीच कॅनॉट प्लेसमध्ये राहते. तिचा कथित मामेभाऊ दुर्गेश एका औषधी कंपनीत नोकरीला आहे, तर अफरोज वाहन खरेदी-विक्री एजंट आहे. भारती व सचिन चार वर्षांपासून अशोक वाघ यांनी स्थापन केलेल्या छावा संघटनेत काम करत होते. ती राज्य महिला प्रदेशाध्यक्ष तर सचिन शहराध्यक्ष होता. भारतीची आठ दिवसांपूर्वीच संघटनेतून हकालपट्टी झाली होती. सचिन प्लॉटिंग व्यवसायसुद्धा करायचा. मैत्री होऊन त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. ३१ जुलैला रात्री भारतीच्या कॅनॉट प्लेसच्या फ्लॅटवर दोघांनी दारू पिली. भारतीने मामेभाऊ दुर्गेश, अफरोजलाही बोलावून घेतले. तिघांनी बेदम मारहाण करत सचिनवर चाकूचे वार करत निघृण हत्या केली.
३१ जुलैपासून भारती फ्लॅटवर परतली नव्हती. अहिल्यानगर पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असता रात्री दीडला तिघेही प्लास्टिकमध्ये मृतदेह घेऊन जाताना दिसले. पैठणच्या पुलावरून त्यांनी मृतदेह गोदावरीत फेकला होता. १३ दिवसांनंतर मृतदेह १४ किलोमीटरवरील मुंगी गावातील पात्रापर्यंत वाहत आला होता. भारतीने मोबाइल बंद करून ठेवला होता. अफरोजने १ ऑगस्टला दोघांना साखरखेर्डा (जि. बुलडाणा) येथे सोडले होते. भारतीने एका मित्राला कॉल केला होता. त्या एका क्रमांकावरून पोलिसांनी साखरखेर्डा येथे जाऊन नातेवाइकाच्या शेतातून भारती आणि दुर्गेशच्या मुसक्या आवळल्या.