बुलढाणा, 23 ऑगस्ट (गुड इव्हिनिंग सिटी) : कुख्यात गुंड शेख हाफिज शेख नफिज उर्फ बाब्याला काल रात्री तीन ते चार जणांनी मर्डर करून संपविले. 36 वर्षीय बाब्या रायपूर जिल्हा परिषद सर्कल साठी तयारी करत होता. त्याच्या खुनाने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
येथील इंदिरानगर मधील कुख्यात गुंड बाब्या काल अमावस्या निमित्त सैलानी येथे जत्रेत गेला होता. मध्यरात्री नंतर त्याचा मृतदेह सैलानीत आढळून आला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला बाब्या आवडत्या पांढऱ्या ड्रेसमध्ये होता. गुड इव्हिनिंग सिटीला मिळालेल्या माहितीनुसार बाब्या सैलानीत दाखल झाल्यावर त्याने तिथल्या आपल्या काही साथीदारांना कॉल करून बोलावले होते. “माझी टीप तुम्ही पोलिसांना देता, तुमच्या xxत चाकूच खूपसतो”, अशा प्रकारची धमकी त्याने मोबाईलवर या लोकांना दिली असल्याचे समजते. समोरचे आरोपी त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर दोघांमध्ये हाणामारी झाली आणि आरोपींनी बाब्याला लाकडी राफ्टरने मारहाण करून आणि नंतर चाकू खुपसून संपवून टाकले. घटना झाल्यानंतर सर्व आरोपी फरार झाले होते. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारावर तीन जणांना ताब्यात घेतले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये बाब्यासोबत तीन ते चार जण यात्रेमध्ये फिरत असल्याचे दृश्य आहेत. गुड इव्हिनिंग सिटीला मिळालेल्या माहितीनुसार मृतक बाब्या पॉकेटमार होता. शिवाय मारहाणीच्या काही प्रकरणांमध्येही त्याचे नाव होते. मागे एकदा त्याला बुलढाणा जिल्हा पोलीस प्रशासनाकडून तडीपार सुद्धा करण्यात आले होते. सध्या मात्र तू एका राजकीय पक्षात काम करीत होता आणि रायपूर जिल्हा परिषद सर्कलसाठी बाब्या तयारी करत होता.