पोलिसांनी योग्य दिशेने तपास करण्याची गरज
बाब्याच्या खूनप्रकरणात दाखल फिर्यादीनुसार अलेक्स इनोक उर्फ रोनी वय 22, शेख सलमान शेख अशपाक वय 25 आणि सैय्यद वाजिद सैय्यद राजू उर्प वाजीद टोपी या तिघांनी जुन्या कारणावरून बाब्याचा खून केला असल्याचे म्हटले आहे. 23 ऑगस्ट 2025 च्य रात्री 12 वाजून 45 मिनीटांनी बरीबाबा दर्गा सैलानीजवळ रस्त्याचे बाजूला चाकूने वार करून व लाकडी दांड्याने मारून बाब्याला संपविण्यात आले.
गुड इव्हिनिंग सिटीला प्राप्त माहितीनुसार बाब्याने मागील वर्षी 11 जुलै रोजी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे रायपूरच्या अवैध धंद्यांविरोधात तक्रार दिली होती. यात म्हटले होते की, रायपूर सर्कलमध्ये बसस्टॅण्डवर चक्री, वरली मटका, अवैध गावठी व देशीदारू सर्रासपणे खुलेआम धंदे सुरु आहे. जागतिक दर्जाच्या सैलानी बाबा येथील बसस्टॅण्डवरही हेच अवैध धंदे सुरु आहेत, रायपूर ठाणेदार यासंदर्भात कुठलीच कारवाई करीत नसल्यामुळे तक्रार देत असल्याचे बाब्याने म्हटले होते. बाब्याने ही तक्रार एमआयएम रायपूर सर्कल अध्यक्ष म्हणून केली होती. उपोषणाचा इशारा देवून आंदोलन करू, असेही तक्रारीत नमूद होते. त्यानंतर काही दिवसांतच बाब्याचे दर्गाह जवळ असलेले घर अज्ञातांनी उध्वस्त केले होते. बाब्याला अवैध व्यावसायिकांकडून जीवे मारण्याच्या धमक्याही आल्या होत्या. सैलानी बाबाच्या संदलमध्ये त्याच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता, अशीही माहिती बाब्याच्या भावाने गुड इव्हिनिंग सिटीला दिली. बाब्याचा इतिहास जरी गुन्हेगारी प्रवृत्तीचा असला तरी तो मागील दोन वर्षांपासून एक चांगला नागरिक म्हणून वर्तन करीत होता. समाजासाठी विधायक कार्य करण्याची त्याची इच्छा होती. यातूनच त्याने राजकीय पक्षाची वाट धरली होती. परंतु जुना वचपा काढण्यासाठी अवैध धंद्यावाल्यांनी त्याचा खून केला, असा आरोप शेफ नफीज उर्फ बाब्याच्या कुटूंबियांनी केला आहे.