बुलढाणा, 24 ऑगस्ट (गुड इव्हिनिंग सिटी/रणजीतसिंग राजपूत) ः काय तो राडा म्हणावा…! रात्री 11.30 वाजेची वेळ.. त्या फ्लॅटमध्ये ‘ती’ तरूणी, ‘तो’ बोक्या अधिकारी आणि त्या तरूणीसोबत आलेले दोन जण यांच्यात हाणामारी.. टिव्ही फूटला.. फेकाफेकी झाली.. अपार्टमेंटमध्ये तमाशाच तमाशा.. बरं शहराच्या एका कोपर्यात नाही तर शहराच्या मध्यभागी हा राडा.. नंतर पोलिसांची एन्ट्री.. साहेब आणि तरूणी ताब्यात…मेडीकलही झाले.. पण साहेब चतुर.. साहेबांनी सगळं सेटल्ड केलं आणि सकाळ होईपर्यंत जो तो आपल्या घरी.. ना कुठे बोंब ना कुठे गाजावाजा ! पोलिस तक्रार झाली नाही हे एक कारण आणि उगाच चारित्र्यावर शिंतोडे नको, या दोन कारणांमुळे आम्ही संबंधित अधिकार्याचे नांव स्पष्टपणे देण्याचे टाळतो आहोत. बुद्धिमान वाचक या बोक्या अधिकार्याला तत्काळ ओळखतील, फक्त त्यांना पूर्ण बातमी वाचावी लागेल.
पूर्ण स्टोरीआधी प्रस्तावना ः दशकभरापूर्वी राज्यातील अनेक अधिकारी बुलढाण्याच्या नावाने नाक मुरडायचे.. आता मात्र बुलढाण्यात येण्यासाठी स्पर्धा लागते.. कारण बुलढाणेकरांची प्रवृत्ती शांत, संयमी आहे.. कुणाचाही फारसा उपद्रव नसतो आणि बुलढाण्यात मनसोक्त भ्रष्टाचार करता येतो, या लुटभावनेतून काही भ्रष्टाचारी अधिकारी बुलढाण्यात आलेले आहेत. जे अधिकारी बुलढाण्याच्या प्रगतिसाठी निःस्वार्थपणे परिश्रम घेतात, अशांना गुड इव्हिनिंग सिटीचा सलाम आहे. पण गोष्ट भ्रष्टाचारी अधिकार्याची सुरु आहे.. तर हा अधिकारी बुलढाण्यात जिल्ह्याच्या अत्यावश्यक विभागाच्या प्रमुख पदावर विराजमान आहे. बायको-मुलं बुलढाण्यापेक्षाही मोठ्या शहरात राहतात.. साहेब बुलढाण्यात एका अपार्टमेंटमध्ये आलिशान जीवन जगतात.. पार्ट्या झोडतात.. ऐश करतात.. रात्र-रात्र जागतात.. आपल्यामुळे अपार्टमेंटमधील इतरांना त्रास होतोय का? याचा जराही विचार न करता यांचं जोरदार सुरु आहे.. सहा महिन्यापूर्वीच अपार्टमेंटवाल्यांनी कंटाळून त्यांना फ्लॅट सोडायची तंबी दिली होती. पण गयावया करून हा बोक्या तिथेच थांबला…पार्टीत जिल्हा परिषदेचे दोन तीन चेहरे असतात.. त्यांची नांवे सुद्धा गुड इव्हिनिंग सिटीला माहिती आहे. वेळ आली तर उजागर करूच पण आपल्याच मस्तीत जगणारा हा अधिकारी स्वतःच्या ‘आरोग्या’ची भरपूर काळजी घेतो.. जीवन ‘अनमोल’ आहे, हे साहेबाला माहित आहे. साहेबांची प्रवृत्तीच अशी आहे की, राह में आए जो दिन दुखी, उनको गले से लगाते चलो.. प्रेम की गंगा बहाते चलोऽऽ ! यातून साहेबांचे किस्से गाजत आहेत, तो भाग वेगळा. अर्थात ऑफिस सुटले की कुणाच्या वैयक्तीक खासगी आयुष्यात पत्रकारांनीही डोकावण्याची गरज नाही. परंतु स्वातंत्र्य आणि स्वैराचारातील फरक साहेबांनी जाणून घेण्याची गरज आहे. आपल्यामुळे अपार्टमेंटवाल्यांना किती मनस्ताप सहन करावा लागतोय, याचा एकदाही विचार या महाशयांनी केला नाही.
मेन स्टोरी ः त्यातूनच 21 ऑगस्टची घटना घडली. साहेबांना भेटायला बीडवरून तरूणी आली.. तिच्या मागोमाग आणखी तीन जण आले. मग साहेबांच्या फ्लॅटमध्ये मारामारी सुरु झाली.. त्यातील एक जण पहलवान असल्याचे कळते. साहेबांना चांगलाच चोप देण्यात आला. तरूणीशी साहेबांचे असणारे नाते साहेबांनाच ठावूक पण फ्लॅटवर तमाशा झाला.. रात्री 11.30 वाजता अपार्टमेंटमधून कुणीतरी 112 वर कॉल केला.. पोलिसांची गाडी आली.. साहेबांना आणि त्या तरूणीसह इतर दोघांना पोलिस स्टेशनमध्ये घेवून गेली.. सर्वांचे मेडीकल झाले.. सदर तरूणीने कुठलीही तक्रार देण्यास नकार दिल्याने पोलिसांचा नाईलाज झाला.. अर्थात कुणाचा ईलाज कसा करायचा, यात साहेब तरबेज आहेत.. महातमाशा होवूनही प्रकरण मॅनेज झाले… पोलिसांनी दोघांकडूनही लिहून घेतले आणि (काही न घेता ?) सोडून दिले.. बीडवाले रात्रीच गेले.. साहेब दूसर्या दिवशी कलेक्टर साहेबांच्या व्हीसीमध्ये हजर.. जणू काही झालेच नाही.. साहेब जणू गाणं म्हणत होते की, ‘गीत’ गाता चल, ओ साथी मुस्कुराता चल…ऽऽ ! इकडे अपार्टमेंट वाल्यांनी मिटींग घेतली. साहेबांना फ्लॅट सोडून जाण्याचे शेवटचे अल्टीमेटम देण्यात आले आहे. दूसर्या दिवशी पोळा होता… आदल्या दिवशी ‘खांदेमळण’ असते.. साहेबांची आदल्या रात्री बीडवरून आलेल्यांनी चांगलीच खांदेमळणी केली होती.. या साहेबांना गुड इव्हिनिंग सिटीची एकच विनंती आहे की, साहेब थोडं आत्मपरीक्षण करा.. तुमच्या थुक्याला थुका लावण्याच्या कार्यपद्धतीला तुमचे ‘मोठे’ साहेबही कंटाळले आहेत… ‘गुलाबा’ला काटे असतात, विसरू नका.. त्यांनी नुकतीच तुमची फाईल हाती घेतली आहे.. बुलढाण्यातून तुम्ही बदली होवून जाणारच… पण जायचं कसं, खाली मान घालून की, उजळ माथा करून, हे ठरवा ! जगा आणि जगू द्या.