महाघोटाळा ! लाडली बहिणीच्या लाभार्थ्यांमध्ये बुलढाण्याचे 192 जिल्हा परिषद कर्मचारी
बुलडाणा, 28 ऑगस्ट (गुड इव्हिनिंग सिटी/रणजीतसिंग राजपूत) ः लाडकी बहीण योजनेतील महाघोटाळा उघड होणे सुरु झाले आहे. अनेक अपात्र महिला उमेदवारांनी स्वतःला मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण भासवून योजनेचा लाभ घेतलेला आहे. सामान्य नागरिकांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारला फसविणे, हे लक्षात येते परंतु सरकारी नोकरदार महिलांनी खोटी कागदपत्रे सादर करून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणे धक्कादायक आहे. विविध विभागातील 1183 सरकारी कर्मचारी महिला ‘बोगस लाडकी बहीण’ आहेत. बुलढाणा जिल्हा परिषदेच्या छाननीमध्ये 13 तालुक्यातील असे 192 कर्मचारी आढळले आहेत, ज्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ उचलला आहे. महाआश्चर्य म्हणजे मेहकर तालुक्यातील एका सफाई कर्मचार्यालाही ‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे साफ केले. या सर्वांविरोधात महाराष्ट्र नागरी सेवा कायदा नियमांतर्गत कारवाईचे आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी गुलाबराव खरात यांनी निर्गमित केले आहेत.
पात्र नसतांनाही शासनाची दिशाभूल करून योजनेचा लाभ घेणे संबंधीत महिला कर्मचार्यांच्या अंगलट येवू शकते. जिल्हा परिषदेतील अनेक महिला कर्मचार्यांनी योजनेचा लाभ घेतला. त्यात प्राथमिक आरोग्य केंद्रातील 186 कर्मचारी कॉन्ट्रॅक्टवरील आहेत. अर्थात यांची गणती अर्धवेळ परिचारिकांमध्ये होते. 6 जणी नियमीत कर्मचारी आहेत. यात एक आरोग्य सेविका, 3 एएनएम, एक लेडी हेल्थ व्हिजीटर आणि एक कनिष्ठ सहाय्यकचा समावेश आहे. या सर्वांवर शिस्तभंगाची कारवाई होवू शकते. सदर योजनेच्या अपात्रतेच्या यादीमध्ये ज्यांच्या कुटूंबातील सदस्य नियमित, कायम कर्मचारी म्हाून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. तथापि 2.50 लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील, असे नमूद आहे. या नियमानुसार बहुतांश कंत्राटी कर्मचारी कारवाईच्या महापुरात डुबणार नाही, असे वाटते. परंतु जे पर्मानण्ट आहेत, परंतु योजनेचा लाभ घेण्यासाठी लाडकी बहीण झाल्या, त्यांचे काय ! जिल्हा परिषेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी आपल्या अधिनस्थ अधिकार्यांना छाननी अहवाल पाठवून अपात्रतेची खातरजमा करण्याच्या सुचना दिल्या आहेत. तो अहवाल जर तंतोतत खरा असेल तर कारवाई अटळ आहे.
एक वास्तविकता यानिमित्ताने चर्चीली जात आहे की, निवडणूकीच्या तोंडावर आणलेल्या लाडक्या बहिण योजनेचा उद्देश्य निवडणूक जिंकणे होता का ? त्यानंतर योजनेमधून लाखो नांवे वगळण्याची प्रक्रिया सुरु आहे. आतापर्यंत ज्या बोगस लाभार्थ्यांनी उचलले, त्यांच्याकडून सरकार वसूली कशी करणार ? जे पैसे खिरापतीप्रमाणे वाटल्या गेले, तो जनतेचा पैसा नव्हता का ? जर वसूली होत नसेल तर ज्यांनी योजना आणली, त्या सत्ताधार्यांच्या आमदार वेतनामधून सदर रक्कम वसूल करावी का ? असे अनेक संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
जानेफळचा ‘राजु’ पण आहे मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण !
तुम्ही पण हसाल कारण योजनेचे नांव ‘लाडकी बहीण’ आहे.. जानेफळचा एक पुरुष कर्मचारी लाभ घेण्यासाठी लाडकी बहीण बनला आहे. त्याने लाभ सुद्धा घेतला असल्याचे छाननी अहवालातून दिसून येत आहे. राजु रतन चांदस्कर हा सफाई कर्मचारी जानेफळ प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत आहे. त्याचा सेवार्थ आयडी 02झेडपीईआरआरसीएम7902 आहे. याला काय म्हणाल ! बोगस महिला लाभार्थी आहेत, पण बोगस पुरुष लाभार्थीसुद्धा लाडकी बहीण योजनेत असल्याचे समोर येत आहे. अर्थात राजु चांदस्कर या सफाई कर्मचार्याने खरंच योजनेचा लाभ घेतला आहे का, याबाबतचा अंतिम अहवाल आल्यानंतर समजेलच.. परंतु प्राथमिक छाननीन राजु चांदस्कर यांचे नांव आल्याने ‘राजु बन गया जंटलमन’ ऐवजी ‘राजु बन गया लाडली बहन’ असे म्हणायची वेळ आली आहे.