सफाई कामगार आणि विधवांच्या हस्ते गणपतीची आरती
बुलढाणा, 29 ऑगस्ट (गुड इव्हिनिंग सिटी) ः गणेशोत्सव केवळ धार्मिक स्वरूपात साजरा न करता त्याला सामाजिकता प्रदान करण्याच्या अनुषंगाने बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या वृत्तेश्वर गणेशोत्सव मंडळाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. याअंतर्गत गुरुवार, 28 ऑगस्ट रोजी आरतीचा सन्मान सफाई कामगार आणि एकल-विधवा महिलांना देण्यात आला. ज्या हातात नेहमी खराटा-झाडू असतो, त्या हातात आरतीचे ताट होते. कुठल्याही धार्मिक कार्यक्रमांपासून विधवा-एकल महिलांना वंचित ठेवले जाते, परंतु वृत्तेश्वर मंडळाने विधवांना आरतीचा सन्मान देवून भेदभावाला हद्दपार करण्याचा सामाजिक संदेश दिला.
वृत्तेश्वर गणेशोत्सव मंडळाने दरदिवशी सामाजिक नावलौकिक असणार्यांना आरतीचा सन्मान देण्याचे निश्चीत केले आहे. पहिली मानाची आरती पत्रकार मंडळींच्या हस्ते झाली. तर संध्याकाळच्या वेळी कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी किरण पाटील आरतीचे मानकरी होते. त्यांच्यासमवेत प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या सुश्री उर्मीलादीदी आणि त्यांचे अनुयायी तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ. पराग नवलकर यांची उपस्थिती होती. दूसर्या दिवशी सकाळी सफाई कर्मचार्यांना आमंत्रित करण्यात आले होते. बुलढाणा शहराचे सफाईचे कंत्राट अकोला येथील कुमोदिनी संस्थेकडे नव्याने देण्यात आले आहे. मागील दोन महिन्यांपासून सदर संस्थेकडून शहरात युद्धस्तरावर सफाईची मोहिम राबविली जात आहे. त्यांच्याप्रति कृतज्ञता म्हणून रस्त्यावर काम करणार्या महिला आणि पुरुष सफाई कर्मचार्यांना आरतीचा बहुमान देण्यात आला. सफाई व्यवस्थापक पंकज काळेंसह अनेक सफाई कर्मचार्यांनी गणपतीची आरती केली. संध्याकाळी विधवा-परितक्त्या एकल महिलांसाठी काम करणार्या मानस फाऊंडेशनला आरतीसाठी आंमत्रित करण्यात आले होते. अध्यक्ष डी.एस. लहाने यांच्यासह श्रीमती शाहिनाताई पठाण, प्रज्ञाताई लांजेवार यांच्यासह इतर पदाधिकारी व सदस्य आरतीसाठी प्रामुख्याने उपस्थित राहिले. ‘विधवा तथा एकल महिलांना मिळालेला हा बहुमान अनिष्ठ धार्मिक रूढी संपविण्याच्या दिशेने सकारात्मक पाऊल असल्याचे गौरवोद्गार यावेळी श्री लहाने यांनी काढले. यावेळी राष्ट्रमाता माँ जिजाऊ अर्बनच्या सौ. अनुजाताई सावळे यांची विशेष उपस्थिती होती. सफाई कामगार आणि विधवा-एकल महिलांच्या हस्ते आरतीची संकल्पना यशस्वी करण्यासाठी बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजीतसिंग राजपूत यांच्यासह महिला सेल जिलाध्यक्ष मृणाल सावळे, पत्रकार सर्वश्री चंद्रकांत बर्दे, राजेश डिडोळकर, नितीन शिरसाट, युवाराज वाघ, रविंद्र गणेशे, गणेश निकम, शिवाजी मामनकर, कृष्णा सपकाळ, सौ. सुरेखाताई सावळे, सुभाष लहाने, भानुदास लकडे, विजय देशमुख, ब्रह्मानंद जाधव, सुनिल तिजारे, विनोद सावळे, प्रशांत खंडारे, राम हिंगे, राजेंद्र टिकार, दीपक मोरे, अजय काकडे, संदीप वंत्रोळे, अभिषेक वरपे, डॉ. भागवत वसे, शौकत शाह, रहमत अली, रमेश उगले, तुषार यंगड, विलास खंडेराव, निनाजी भगत, रविकिरण टाकळकर, सुनिल मोरे, अजय राजगुरे, अक्षय थिगळे आदिंनी परिश्रम घेतले.