बुलढाणा, 5 सप्टेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) : एलसीबीच्या पथकाने एका दिवसातच कारंजा चौकातील दुर्गा माता मंदिराची दानपेटी चोरणारे दोन आरोपी पकडले. दोन्ही आरोपी शहरातील वार्ड क्रमांक 2 मधील असून दानपेटीमधून त्यांनी 19 हजार रुपये चोरले असल्याचे समोर आले आहे. यातील 14 हजार रुपये आरोपींनी ऐशमध्ये उडवले असल्याने केवळ 5 हजार रुपये पोलिसांना हस्तगत करता आले. 2 सप्टेंबरच्या मध्यरात्रीनंतर कारंजा चौकातील दानपेटी चोरण्यात आली होती. याबाबत मंदिरातील गाभाऱ्यामध्ये असणाऱ्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक आरोपी आढळून आला होता. चोरीची तऱ्हा आणि वजनदार दानपेटी या दोन गोष्टींमुळे या प्रकरणांमध्ये एकापेक्षा अधिक आरोपी असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले होते. मंदिर परिसरातील इतरही सीसीटीव्ही फुटेचा आधार घेण्यात आला. त्यानंतर सदर दानपेटी चोरण्यामध्ये दोन जण सहभागी असल्याचे स्पष्ट झाले. अक्षय दिगंबर गवार गुरु (वय 28) आणि मनोहर कैलास पवार (वय 30) या दोन आरोपींनी दानपेटीत चोरून ती प्रबोधन विद्यालयाच्या कॉर्नर जवळ आणून ठेवली होती. दानपेटीतील पत्रा वाकवून आतील रक्कम चोरण्यात आली होती. दानपेटी दोन जणांकडून सुद्धा उचलणे शक्य नसल्यामुळे त्यांनी यासाठी इंडियन गॅस एजन्सीच्या गल्लीतून एक पायडल रिक्षा आणली होती. पोलिसांनी विविध सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आणि तंत्रज्ञानाची मदत घेत दोन्ही आरोपींना जेरबंद केले. पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पीआय सुनील अंबुलकर यांच्या आदेशाने पीएसआय अविनाश जायभाये, हेड कॉन्स्टेबल दीपक लेकुरवाळे, चांद शेख, गणेश पाटील, कॉन्स्टेबल गजानन गोरले, एलपीसी कोमल इंगळे तसेच टीएडब्ल्यू राजू आडवे आणि ऋषी खंडेराव यांच्या पथकाने एका दिवसातच मंदिरातील दानपेटी चोरीचा परदाफाश केला. आरोपींकडून 19 हजार रुपयांपैकी केवळ 4 हजार 755 रुपये मिळाले. या भलामोठ्या वजनदार दानपेटीला खालून चाके असल्यामुळे तिला सहज एका ठिकाणाहून दुसरीकडे हलविण्यात आरोपी यशस्वी झाले होते.
@goodeveningcity
05sep2025. 09:10
◾◾◾◾◾◾