बुलढाणा, 10 सप्टेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) : राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाच्यावतीने जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 1832 प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन प्रक्रीयेव्दारे बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये मराठी शाळेतील 1660 तर उर्दू शाळांमधील 172 शिक्षकांचा समावेश आहे.
दरम्यान शासनस्तरावरून संपन्न झालेल्या या ऑनलाईन बदलप्रक्रीयेतील शिक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी एका आदेशाव्दारे मंगळवारी (दि. ९) बदली झालेल्या शाळेवर रूजू होण्यासाठी कार्यमुक्त केले असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही यादृष्टीने प्रशासकीय विभागाने त्वरीत कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिले आहेत. तसेच बदलीप्रक्रीयेनंतर कुठल्याही शाळेवर अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाल्यास त्याबाबत तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश सुध्दा दिले आहेत.
राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाने दिनांक १८ एप्रिल २०२४ च्या शासन निर्णयाव्दारे राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन प्रक्रीयेव्दारे बदली करण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय घेतला होता. त्याअनुषंगाने विविध बदली संवर्गातील जिल्हा परिषद शिक्षकांना ऑनलाईन बदली पोर्टलवर आपले विकल्प नोंदविण्याची संधी देण्यात आली होती. बदली प्रक्रीयेतील पारदर्शकतेचे धोरण म्हणून पार पडलेल्या या बदल्यांमध्ये बुलढाणा जिल्हा परिषद अंतर्गत 1660 मराठी माध्यमांच्या तर 172 उर्दू माध्यमांच्या प्राथमिक शिक्षकांचा समावेश आहे. बदली झालेल्या शिक्षकांचा तालुकानिहाय तपशिल खालीलपमाणे आहे. कंसातील आकडे बदली झालेल्या शिक्षकांची संख्या दर्शवितात.
मराठी माध्यम :- बुलढाणा(129), चिखली(171), देऊळगाव राजा(113), जळगाव (86), खामगाव(196), लोणार(84), मलकापूर(96), मेहकर(196), मोताळा(167), नांदुरा(113), संग्रामपूर(49), शेगाव(95), सिंदखेडराजा(165) एकूण 1660
उर्दू माध्यम :- बुलढाणा(21), चिखली(28), देऊळगाव राजा(01), जळगाव (03), खामगाव(31), लोणार(03), मलकापूर(03), मेहकर(05), मोताळा(31), नांदुरा(11), संग्रामपूर(17), शेगाव(09), सिंदखेडराजा(09) एकूण 172
दरम्यान बदली झालेल्या शिक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी एका आदेशाव्दारे मंगळवारी (दि. ९) बदली झालेल्या शाळेवर रूजू होण्यासाठी कार्यमुक्त केले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही या दृष्टीने पदांचा समतोल कायम राहील याबाबत प्रशासनाने पूर्णत: दक्षता घेतलेली आहे. तथापि बदलीप्रक्रीयेनंतर कुठल्याही शाळेवर अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाल्यास त्याबाबत तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश सुध्दा सर्व गटशिक्षणाधिकारी यांना मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गुलाब खरात यांनी दिले आहेत.
सदर बदली प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने व शासन निर्णयानुसार पार पडली असल्याने बदली झालेल्या व बदललेल्या सर्व शिक्षकांना तातडीने हजर करून घ्यावे. सदर प्रक्रियेमध्ये जिल्हा पातळीवर कोणत्याही शिक्षकाची बदली करण्याचे वा स्थगित अथवा रद्द करण्याचे कोणतेही अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा तालुका स्तरावरील कोणत्याही अधिकाऱ्यांना नाहीत. त्यामुळे याबाबत शाळा व्यवस्थापन समिती,पालक यांनी विद्यार्थी हित लक्षात घ्यावे. तसेच विद्यार्थ्यांना पंचायत समितीत किंवा जिल्हा परिषदेत आणणे, शाळेला कुलूप लावणे , शाळा बंद करणे अशा कोणत्याही असंवैधानिक बाबी करू नयेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.