बुलढाणा, 16 सप्टेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) : आज सकाळपासून ढगांच्या गडगडाटासह सुरू झालेला पाऊस विजांचा कडकडाट सुद्धा घेऊन आला. क्रीडा संकुल मार्गावरील सालासार मार्बल परिसरातील भूषण यंदे यांच्या घरावर सकाळी 9:30 वाजेदरम्यान वीज कोसळली. भला मोठ्ठा जाळ झाला… ज्या टॉवरवर विजेचा पहिला आघात झाला, त्याची भिंत ब्लास्ट व्हावा तशी फुटली… विटांचे तुकडे शंभर फुटांपर्यंत फेकले गेले… अग्निशलाका आणि कानठळ्या बसवणारा आवाज परिसरातील असंख्य घरांना धडकी भरविणारा होता… काहीतरी अघटित घडले, याची अनेकांना खात्री होती. पाऊस असल्यामुळे कुणालाच बाहेर पडता येत नव्हते… सुदैवाने या विजेच्या तांडवात कोणी सापडले नाही… कुठलीच जीवित हानी झाली नाही… यंदे यांच्या घराच्या उजव्या आणि डाव्या बाजूला राहणारे दोन्ही घरांमधील इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे शॉट झाली. यंदे यांच्या घरातील टीव्ही, फ्रिज आणि इतर इलेक्ट्रिकल उपकरणे बंद पडली. बाजूला राहणारे मंडळ अधिकारी गुलाबराव गवई आणि कुलदीप पवार यांनाही वीजेचा फटका बसला आहे.. शोभाताई यंदे आणि आशाताई गवई यांनी आपापल्या घरातून वीज पडताना प्रत्यक्ष पाहिली. गुड इव्हिनिंग सिटीशी बोलताना यांनी सांगितले की जवळपास पंधरा फूट लांब आणि आठ ते दहा फूट रुंद असा भला मोठा जाळ झाला… डोळे दिपवणारा प्रकाश आणि त्यातून पडणाऱ्या ठिणग्या पाहतांना अत्यंत घाबरलो होतो… त्यात प्रचंड आवाजाने धडकी भरली होती, या शब्दांत प्रत्यक्षदर्शींनी घटनेचे वर्णन केले. वीज कोसळल्यानंतर यंदेंच्या घराकडे अनेकांनी धाव घेतली. जीवित हानी झाली नसल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. तीन ते चार घरांमधील इलेक्ट्रिक उपकरणांचे झालेले नुकसान पाहून महावितरण कंपनीने भरपाई द्यावी, अशी मागणी नागरिकांची आहे.